बेळगाव : धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास

बेळगाव : धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : विनायक मार्ग, 5 वा क्रॉस समर्थ नगर येथे मागील 8 वर्षांपासून गांभीर्याने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास पाळण्यात येतो. हे बलिदान मास पाळत असताना गल्लीतील कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक आपापल्या परीने आपल्याला आवडत्या वस्तू 1 महिन्यासाठी सोडुन देतात. या भागामध्ये विशेष करून महिला व मुलीची संख्या जास्त आहे. तसेच लहान मुलांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल माहिती सांगण्यात येते. तसेच दररोज रात्री 8 ला विधिवत पुजा करून ध्येय मंत्र आणि प्रेरणा मंत्र म्हटले जाते.
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण व्हावे, यासाठी प्रतिवर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे बलिदान मास आचरण्यात येतो. संभाजी महाराजांनी हिंदुधर्मासाठी आपल्या प्राणाचं तब्बल 40 दिवस (फाल्गुन शु. प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या) औरंगजेब चे पाशवी अत्याचार सहन करून बलिदान दिलं, ते बलिदान हिंदूधर्म कधीच विसरू शकत नाही. फाल्गुन प्रतिपदेपासून फाल्गुन अमावास्येपर्यंत बलिदान मास पाळण्यात येतो. रविवार 14 मार्चपासून बलिदान मासची सुरुवात झाली आहे.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे जिल्हाप्रमुख श्री किरण गावडे, तालुका कार्यवाह परशराम कोकितकर, शहरप्रमुख अजित जाधव, शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, संतोष कणेरी, उमेश ताशीलदार, गिरीश कणेरी, अरुण गावडे, किशोर कुंडेकर, परशराम बेकवाडकर, अशोक खवरे, निर्मल कणेरी, नागेश गावडे, नागेश नायक, संजय पाटील, पिंटो भोसले, प्रिया बेडका आदी नागरिक, महिला, बालचमू उपस्थित होते.
कशाप्रकारे क्रूरतेची सीमा पार करून छळ छळ करून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना जीवे मारण्यात आले हे आजही आठवले तरी, कोणाचाही डोळ्यात टचकन पाणी आल्याशिवाय राहणार नाही. इतिहासाच्या पानावर शुरतेचे प्रतिक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते म्हणजे 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज'. संभाजी महाराजांना अटक झाल्यानंतर त्यांनी शेवटच्या काही दिवसात अन्नपाण्याचा त्याग केला. हे लक्षात घेऊन प्रत्येक धारकरी बलिदान मास आचरणात आणतो. या महिन्यात दिवसाकाठी एकदाच जेवण करून हा मास घरचे सूतक म्हणून पाळतो. चहा पिणे, गोड खाणे, टीव्ही पाहणे, पायात पादत्राणे घालणे यापैकी एका गोष्टीचा त्याग करून महाराजांच्या बलिदानाचे स्मरण केले जाते.
गाव, गल्ली, विभागवार संभाजी महाराजांची नित्यपूजा करण्यात येते. महाराजांच्या पराक्रमाचे वाचन, श्लोक वाचन केले जातात. हा कालावधी बलिदान मास आचरणाबरोबरच सुतक म्हणून पाळण्यात येतो. संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची न निघालेली अंत्ययात्रा फाल्गुन अमावास्येदिवशी शहरात काढून श्रद्धांजली वाहण्यात येते.
कोण होते संभाजी महाराज ?
‘छत्रपती शिवाजी महाराज’ आणि त्यांच्या पहिल्या ‘पत्नी सईबाई’ यांचे मोठे चिरंजीव म्हणजे संभाजीराजे. त्यांना शंभूराजे म्हणून देखील ओळखले जाते. मराठा साम्राज्याचे व हिंदवी स्वराज्याचे ते दुसरे छत्रपती होते. आपल्या कर्तुत्वावर आणि ज्ञानावर वयाच्या 23 व्या वर्षी ते छत्रपती बनले.
शंभूराजांचे बालपण
संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. जेव्हा शंभूराजे केवळ 2 वर्षांचे होते तेव्हाच त्यांची आई सईबाई यांचे निधन झाले. आणि तेव्हाच त्यांच्या संघर्षाला सुरुवात झाली. सईबाईनंतर त्यांचा सांभाळ राजमाता जिजाऊ व महाराणी पुतळाबाई [शिवाजी महाराजांच्या पत्नी] यांनी केला, त्यांच्यावर संस्कार घडवले. त्यामुळे एक शूर योद्धा होण्याचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. शिवाजी महाराजांनी शंभूराजांना ‘आग्रा भेटीच्या’ वेळी सोबत नेले तेव्हा ते केवळ 9 वर्षांचे होते युद्ध, राजकारण, राजकारणातील डावपेज, रयतेवरील प्रेम आणि शुरतेचे धडे त्यांना लहान वयामध्येच मिळाले. याचबरोबर शंभू राजांना वयाच्या 14 व्या वर्षी वाचनाची आणि लिखाणाची आवड निर्माण झाली. त्यांनी त्या काळात संस्कृत भाषेचे ज्ञान घेतले आणि वयाच्या 15 व्या वर्षी ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ लिहला. आणि ते संस्कृत पंडित झाले.
औरंगजेबाने क्रूरतेने केला होता शंभूराजांचा अंत...
आजही छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू कशाप्रकारे झाला हे आठवले तरी कोणाचेही रक्त उसळल्याशिवाय आणि डोळ्यामध्ये टचकन पाणी आल्याशिवाय राहणार नाही. संभाजी महाराज आणि कवी कलश हे शत्रूंच्या तावडीत सापडले त्या दिवसापासून[फाल्गुन शुक्ल प्रतिपदा] तब्बल 40 दिवस ना ना प्रकारे औरंगजेबाने त्यांना मरणयातना दिल्या. धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केल्यानंतर संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या औरंगजेबाने अत्यंत निर्दयीपणे हाल -हाल करून त्यांना जीवे मारण्याचे आदेश दिले. संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. संभाजीराजांना डोळे फोडणे, कानात शिसे ओतणे, जिभ कापणे या सारख्या क्रूर शिक्षा दिल्या. अखेर 11 मार्च ला औरंगजेबाने त्यांना ठार मारले आणि त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे करून ते तुळापुर येथील नदीमध्ये फेकण्यात आले. धर्मांतर करण्याचा प्रस्ताव धुडकावून आपल्या देहाचे बलिदान करणारा एखादाच असतो आणि त्यासाठी सिंहाचे काळीज असावे लागते.
धर्मनिष्ठा आणि स्वराज्यनिष्ठा काय असते हे दाखवून देणारे धर्मवीर म्हणजे संभाजीराजे...!

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm