बेळगाव ता. खानापूर : भीमगड अभयारण्यातील गवाळी येथे जंगलाजवळील शिवारात गुरे चारावयास गेलेल्या वृद्ध महिलेवर रानडुक्करांनी हल्ला चढविल्याने सावित्री बाबू गावडा (वय 75) या गंभीर झाल्याची घटना गुरुवारी (18 फेब्रुवारी) दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली. भीमगड वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने जीपमधून तिला खानापुरातील सरकारी दवाखान्यात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू आहेत.
सावित्री या गावापासून 300 मीटर अंतरावर आपली व गावातील अन्य काहीजणांची गुरे घेवून गेल्या होत्या. ओढ्याजवळ जनावरे चारत असताना जंगलातून आलेल्या रानडुक्कराने हल्ला चढविला. मागून आलेल्या डुक्करने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या अंगात सुळे घुसले. चेहऱ्यावर पडल्याने त्यांच्या चेहऱ्यालाही जखम झाली आहे. हातातील काठीने वृद्धेने प्रतिकार केल्याने डुक्करांनी जंगलात पळ काढला.
हल्यात वृद्धेच्या दोन्ही पायांत सुळे घुसल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. जखमी अवस्थेत तिने घर गाठले. त्यानंतर हेम्माडगा येथील वनाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. उपवनक्षेत्रपाल एम. जी. नंद्यापगोळ यांनी तातडीने गवाळी गाव गाठून वृद्धेला खानापूर सरकारी दवाखान्यात आणले. त्यानंतर उपचार करण्यात आले.