बेळगाव शहरात 5 मजली वाहनतळ व व्यापारी संकुल;

बेळगाव शहरात 5 मजली वाहनतळ व व्यापारी संकुल;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव शहरातील बापट गल्लीतील महापालिकेच्या वाहनतळावर बहुमजली वाहनतळ बांधण्याचा निर्णय स्मार्टसिटी विभागाने घेतला आहे. हा वाहनतळ 5 मजली असेल, अशी माहिती स्मार्टसिटी योजनेचे व्यवस्थापकीय संचालक शशीधर कुरेर यांनी दिली. या योजनेसाठी 10.50 कोटी रुपये खर्च करण्यात येतील. वाहनतळ व व्यापारी संकुल असा तो प्रकल्प असल्याची माहितीही त्यांनी दिली. संचयनी सर्कल येथेही बहुमजली वाहनतळाचा प्रस्ताव असल्याचे कुरेर यांनी सांगितले. बापट गल्लीत सध्या वाहनतळ आहे. तेथे सुमारे 80 चारचाकी वाहने लावता येतात.
या ठिकाणी बहुमजली वाहनतळाचा पहिला आराखडा 2006 मध्ये तयार केला होता. तत्कालीन प्रशासक डॉ. शालीनी रजनीश यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. बेळगावातील आर्किटेक्टनी त्याचा आराखडा तयार केला, पण वाहनतळाचे घोडे निधीअभावी अडले. 2017 मध्ये शंभर कोटी रुपये निधीतील खर्चातून बहुमजली वाहनतळ बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यासाठी 4.5 कोटींची तरतूद केली. निविदेतून मुंबईतील कंपनीने कामाचा ठेका घेतला. वाहनतळासाठी ठेकेदाराने आरेखन केल्यानंतर अडथळा ठरणारी 14 झाडे तोडण्यासाठी वन खात्याकडे परवानगी मागितली. जुलै 2017 मध्ये जीएसटी लागू झाली. त्यामुळे वाहनतळाचा खर्च वाढल्याचे कारण देत ठेकेदाराने म नाकारले. त्यानंतर वाहनतळाचा नवा आराखडा तयार केला. पण तो नगरविकास खात्याने नामंजूर केला. 2019 मध्ये बहुमजली वाहनतळासाठी राखीव 4.5 कोटी रुपये निधी अमृत योजनेकडे वर्ग केला.
पीपीपी तत्त्वावर होणार : स्मार्टसिटी विभागाने बहुमजली वाहनतळासाठी पुन्हा बापट गल्लीतील जुन्या वाहनतळाचीच निवड केली आहे. कुरेर यांच्या मते त्या ठिकाणी 150 हून अधिक वाहने लावण्याची क्षमता असेल. दुचाकी व चारचाकी अशा दोन्ही प्रकारच्या वाहनांसाठी वाहनतळ असेल. वाहनतळ पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी PPP) तत्त्वावर असेल, त्यासाठी तेथे व्यापारी संकुलही होणार असून, निविदा काढण्यात आल्याचेही कुरेर यांनी सांगितले. स्मार्टसिटी योजनेतून काम सुरू झाल्यास तोवर वाहनतळ बंद करावा लागेल. तसे झाल्यास वाहनतळ पूर्ण होईपर्यंत पार्किंग समस्या उद्भवणार आहे.
बाजारपेठेत वाहनतळाची गरज : बेळगावात पार्किंगची समस्या गंभीर झाल्यामुळे वाहनतळांची गरज आहेच. खासकरून मुख्य बाजारपेठेत वाहनतळाची गरज आहे. बापट गल्ली व खंजर गल्लीत वाहनतळ आहे; पण त्यातील केवळ बापट गल्लीतील वाहनतळ सुरू आहे. खंजर गल्लीतील वाहनतळ अद्याप सुरूच झालेला नाही. स्मार्ट सिटी योजनेतून अनेक नवे प्रकल्प राबविले जात आहेत. त्यात वाहनतळाचा समावेश केल्यामुळे शहरातील पार्किंगची समस्या सुटेल, अशी अपेक्षा आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव शहरात 5 मजली वाहनतळ व व्यापारी संकुल;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm