दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज; सिंधु बॉर्डरवर तणाव;

दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण;
दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज;
सिंधु बॉर्डरवर तणाव;

belgavkar.com | belgaum | belgavkar

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. शेतकऱ्यांचा एक जत्था गाजीपूर बॉर्डरवरून आयटीओला पोहोचला होता. हा जत्था लाल किल्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता.

अक्षरधाम-नोएडा मार्गावर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना आऊटर रिंगरोडवरून जाण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, या मार्गाने न जाता आंदोलकांनी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. याच दरम्यान शेतकऱ्यांमधून पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. ही दगडफेक सुरू होताच पोलिसांनीही शेतकऱ्यांवर लाठीचार्ज सुरू केला. त्यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी पोलिसांच्या बॅरिकेट्स तोडल्या. शेतकऱ्यांनी काही वाहनांची तोडफोडही केली. परिणामी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करावा लागला. येथील मुकरबा चौकातही परिस्थिती नियमंत्रणाबाहेर गेली आहे. टिकी बॉर्डरवर नांगलोई येथे पोलिसांच्या बॅरिकेट्स तोडण्यात आल्या आहेत.

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सुरक्षेच्या कारणास्तव लावण्यात आलेल्या नियमांचा शेतकऱ्यांनी भंग केला आहे. दिल्लीत वेगवेगळ्या भागात निघालेल्या या ट्रॅक्टर रॅलीतील संतप्त जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना अनेक ठिकाणी बळाचा वापर करावा लागला आहे. त्यामुळे या परिसरातील वातावरण अधिकच तापलं आहे.
आधीच रॅलीला सुरुवात : शेतकऱ्यांना 12 वाजता रॅली काढण्याची परवानगी देण्यात आलेली होती. पण त्याआधीच शेतकऱ्यांनी रॅलीला सुरुवात केली. ही रॅली रोखण्यात पोलिसांना अपयश आले. एवढेच नव्हे तर आंदोलक शेतकरी शेतकरी नेत्यांचंही काहीही ऐकत नसल्याचं चित्रं आहे.
सिंधु बॉर्डरवर तणाव : पोलिसांनी सिंधु बॉर्डरकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले होते. ट्रॅक्टर रॅलीत सामिल होणाऱ्या रुग्णवाहिकाही पोलिसांनी रोखल्या होत्या. सिंधु बॉर्डरवरून निघालेली ही रॅली कंझावाला चौक-औचंदी बॉर्डर-केएमपी-जीटी रोड जंक्शनच्या दिशेने ही रॅली निघाली. त्यानंतर ही रॅली संजय गांधी ट्रान्स्पोर्ट नगरपर्यंत पोहोचली. या रॅलीत डीटीयू-शाहबाद-एसबी डेयरी- दरवाला- बवाना टी-पॉइंट- कंझावाला चौक- खरखौदा टोल प्लाजा या मार्गे ही रॅली निघणार होती. संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगरमध्ये काही शेतकरी पोलिसांच्या वॉटर कॅननच्या गाडीवर चढले. त्यामुळे या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
सिंधु बॉर्डवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त : दरम्यान, शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने सिंधु बॉर्डरवर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून आंदोलकांना शांततेत रॅली करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज; सिंधु बॉर्डरवर तणाव;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm