बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेतील (Smart City) पहिल्या बहुमजली वाहनतळ व व्यापारी संकुलासाठी निविदा काढण्यात आली आहे. टिळकवाडीतील पहिल्या रेल्वे फाटकाजवळ महापालिकेच्या जागेत वाहनतळ व व्यापारी संकुल होणार आहे. पहिल्या रेल्वे फाटकाजवळील दळवी सेल्सच्या जागेसह महापालिकेच्या जुन्या संकुलाच्या जागेत ही योजना राबविण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी योजनेतून शहरात 2 ठिकाणी बहुमजली वाहनतळ होणार आहेत. दुसरा वाहनतळ माळमारुतीत महापालिकेच्याच जागेत होणार आहे.
टिळकवाडीतील योजना 15 कोटी रुपयांची आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी PPE) तत्त्वावर ही योजना राबविली जाणार आहे. यासाठी स्मार्ट सिटी विभागाने इच्छुकांकडून निविदा मागविल्या आहेत. 20 जानेवारी रोजी ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. स्मार्ट सिटी माळमारुतीमधील महांतेशनगरमध्ये बहुउद्देशीय व्यापारी केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. ही योजनाही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावरच असेल. त्यासाठीही निविदा योजनेतूनच मागविल्या आहेत. या योजनेसाठी 16 कोटी खर्च केले जाणार आहेत. बहुमजली वाहनतळ व व्यापारी संकुल तसेच बहुउद्देशीय व्यापारी केंद्रांसाठी स्मार्ट सिटी विभागाला गुंतवणूकदारांची आवश्यकता आहे. या दोन्ही ठिकाणी संकुल व केंद्राची निर्मिती झाली तर पुढील काही वर्षे त्यांचा ताबा संबंधित ठेकेदार कंपनी किंवा गुंतवणूकदाराकडेच असणार आहे.
बेळगावातील पहिला बहुमजली वाहनतळ बापट गल्लीत होणार होता. त्यासाठी 4.5 कोटी रुपयांचा निधीही राखीव ठेवला होता. त्यासाठी 2018 मध्ये महापालिकेने ठेकेदारही नियुक्त केला होता. पण, जीएसटीचे कारण देत ठेकेदाराने हे काम नाकारल्याने राखीव निधी अमृत योजनेकडे वर्ग केला. त्यानंतर रेल्वे स्थानकासमोर बहुमजली वाहनतळ बांधण्याची घोषणा झाली. पण, ते कामही अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे स्मार्टसिटी योजनेतील बहुमजली वाहनतळ निर्धारित वेळेत झाला तर तो शहरातील पहिला ठरेल.
बाजारपेठेत वाहनतळाची गरज : बेळगावात पार्किंगची समस्या गंभीर झाल्यामुळे वाहनतळांची गरज आहेच. खासकरून मुख्य बाजारपेठेत वाहनतळाची गरज आहे. बापट गल्ली व खंजर गल्लीत वाहनतळ आहे; पण त्यातील केवळ बापट गल्लीतील वाहनतळ सुरू आहे. खंजर गल्लीतील वाहनतळ अद्याप सुरूच झालेला नाही. स्मार्ट सिटी योजनेतून अनेक नवे प्रकल्प राबविले जात आहेत. त्यात वाहनतळाचा समावेश केल्यामुळे शहरातील पार्किंगची समस्या सुटेल, अशी अपेक्षा आहे.