बेळगाव : येळ्ळूर गावाजवळील 40 एकर सरकारी जागेत पुण्यातील बालेवाडीसारखे आंतरराष्ट्रीय इनडोअर स्टेडियम उभारण्याचा संकल्प आमदार अभय पाटील यांनी केला आहे. राज्य युवजन क्रीडा खात्याचे आयुक्त के. श्रीनिवास यांच्यासोबत त्यांनी या जागेची पाहणी केली. बेळगाव शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर आहे. त्याचप्रमाणे क्रीडाक्षेत्रातही आघाडीवर असावे यासाठी येळ्ळूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्यासाठी सरकारी जागेची व आर्थिक साहाय्य करण्याची विनंती राज्य व केंद्र सरकारकडे केली आहे.
या इनडोअर स्टेडियमबद्दल सरकारशी अनेकदा चर्चा केली आहे. उत्तर कर्नाटकातील अनेक खेळाडू राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. त्यांना सुसज्ज स्टेडियम व मैदानाची गरज आहे. येळ्ळूरमध्ये असे स्टेडियम झाल्यास दक्षिण भारतातील ते अशा प्रकारचे पहिले आंतरराष्ट्रीय स्टेडियम होईल, अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली.
यावेळी क्रीडा खात्याचे उपसंचालक सतिश सज्जन, जिल्हा युवजन सेवा व क्रीडा खाते अधिकारी एच. डी. कोलेकर, पीडीओ अरुणकुमार, तलाठी मयूर मासेकर, प्रशिक्षक संजीव नाईक, बसवराज होसमठ, अशोक शिंत्रे, मोहन पत्तार, राजेंद्र कोलकार, नामदेव मिरजकर, नागराज आर., बसवराज बी. आदी उपस्थित होते.