बेळगाव : रेल्वे ओव्हर ब्रिज नजीकच्या गोगटे सर्कल येथील उद्यानाच्या विकासाबरोबरच त्या ठिकाणी सैनिक स्मारक निर्माण करण्यास कोणतीच हरकत नसल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी सांगितले असल्याची माहिती आमदार अनिल बेनके यांनी दिली आहे. सोमवारी (23 नोव्हेंबर) कॅन्टोन्मेंट बोर्डाची सर्वसाधारण बैठक पार पडली. मराठा लाईट इन्फंट्रीच्या सहकार्याने विकासकामे हाती घेतली जाणार आहेत.
गोगटे सर्कल येथील सूर्यकांत पार्क उद्यानाचे सैनिक स्मारकामध्ये रूपांतर करण्याची योजना गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. या स्मारकासाठी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक होते. त्याला बोर्डाने हिरवा कंदील दिला आहे. दरम्यान कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बर्चस्वा यांनी नियोजित सैनिक स्मारकास आपली हरकत नसल्याचे सांगितले आहे.