ट्रॅक्टरमधून पडून मुलगा जागीच ठार
बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील व्हनेहळ्ळीनजीक नवीन ट्रॅक्टरमधून खड्यात पडल्याने दिवाळीसाठी मामाच्या गावी आलेला मुलगा ठार झाला. बुधवारी (18 नोव्हेंबर) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सुमेद संजय जैनापुरे (वय 13, रा. गव्हाण, ता. निपाणी) असे मृत मुलाचे नाव आहे. संकेश्वर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सुमेद दीपावलीनिमित्त मामाच्या गावी व्हनेहळ्ळी (ता. हुक्केरी) येथे जयकुमार मल्लाप्पा लब्बी यांच्याकडे आला होता. तेथे नवीन ट्रॅक्टरमध्ये बसून जात असताना तोल जाऊन खड्ड्यात पडल्याने सुमेदचा जागीच मृत्यू झाला. ऐन दीपावली सणात हा अपघात घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.