बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील बाची गावामध्ये जनता कॉलनी रोडलगत बसस्थानका शेजारीचं असलेली 2 बंद घरे फोडून दिवसाढवळ्या चोरी करण्यात आली. एका घरातील साडेबारा तोळे सोन्याचे दागिने आणि 7500 ऊपये रक्कम तर दुसऱ्या घरामधील एक तोळे सोन्याचे दागिने आणि साडेनऊ तोळे चांदीचे दागिने अशी एकूण अंदाजे जवळपास 12 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे उघड झाले आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की, बाचीच्या उत्तरेला जनता कॉलनी आहे. आणि या जनता कॉलनीकडे जाणाऱ्या रोडलगतच बसस्थानकाशेजारीच असलेल्या बोकडे आणि गावडे यांच्या घरातील मंडळी नोकरीनिमित्त बाहेर गेली असताना चोरट्यांनी पाळत ठेवून धाडसी चोरी केल्याचे समजते.
यामध्ये बोकडे यांच्या घराला कुलूप होते. पती-पत्नी दोघेही नोकरीवर जात होते. तसेच ते नेहमी चावी एका ठिकाणी ठेवत असत. हे कोणीतरी पाहून सदर चावीने कुलूप खोलून आतील तिजोरी खोलून त्यातील साडेबारा तोळे सोन्याचे दागिने आणि सात हजार ऊपयांची रक्कम लांबविली असा संशय आहे.
तर गावडे यांच्या घराचे कुलूप तोडून एक तोळे सोन्याचे दागिने आणि साडेनऊ तोळे चांदीचे दागिने चोरीला गेली आहे. बोकडे आणि गावडे या कुटुंबांनी वडगाव ग्रामीण पोलिसात चोरी झाल्याची रितसर नोंद केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
