शरीरावर 22 जणांच्या नावाचे टॅटू, यापैकीच एक खुनी;

शरीरावर 22 जणांच्या नावाचे टॅटू, यापैकीच एक खुनी;

belgavkar.com | belgaum | belgavkar

मुंबई स्पा हत्याकांडचं भयंकर गुपित उलगडलं

मुंबई : वरळीतील एका 52 वर्षीय व्यक्तीची स्पामध्ये भीषण पद्धतीने हत्या करण्यात आली होती. ही व्यक्ती आपल्या 21 वर्षीय गर्लफ्रेंडसोबत स्पामध्ये गेली होती. तेव्हा दोन लोक स्पामध्ये आले, त्याच्या गर्लफ्रेंडला दुसऱ्या खोलीत घेऊन गेले, त्यानंतर धारदार शस्त्राने या व्यक्तीची हत्या करण्यात आली. या प्रकरणात आरोपीला पकडण्याची कहाणी अत्यंत धक्कादायक आहे. मृत व्यक्तीच्या शरीरावर 22 जणांच्या नावाचे टॅटू होते. हे सर्व आपले शत्रू आहेत असं त्याचं म्हणणं होतं. गुरु वाघमारे नावाच्या व्यक्तीची या घटनेत हत्या करण्यात आली आहे.
maharashtra-mumbai-spa-murder-case-secret-revealed-guru-waghmare-tattooed-22-name-of-enemies-on-body-202407.jpeg | शरीरावर 22 जणांच्या नावाचे टॅटू, यापैकीच एक खुनी; | belgaum news | belgavkar बेळगावकर
मंगळवारी (17 जुलै) संध्याकाळी गुरु वाघमारे वरळीतील सॉफ्ट टच स्पामध्ये गेले. त्यादिवशी गुरुचा वाढदिवस होता, त्यामुळे गुरुची 21 वर्षांची गर्लफ्रेंड आणि तीन मित्रांनी पार्टी केली. हे पाचही जण पार्टीसाठी सायनमधील एका हॉटेलमध्ये गेले आणि तिथे त्यांनी पार्टी केली. पार्टीनंतर रात्री साडेबारा वाजता सर्वजण सॉफ्ट टच स्पामध्ये परतले. काही काळानंतर, गुरुचे तीन मित्र तिथून निघून गेले. तर त्याची गर्लफ्रेंड त्याच्यासोबत होती. त्यानंतर दोन तासांनंतर दोघेजण स्पामध्ये आले आणि त्यांनी गुरुवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या केली.
जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना गुरु वाघमारे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. गळा चिरुन त्याची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. वाघमारेच्या गर्लफ्रेंडसह चार जणांची चौकशी केली. शवविच्छेदन अहवालानुसार, गुरु वाघमारेने आपल्या मांडीवर 22 शत्रूंची नावे गोंदवून ठेवल्याचं समोर आलं. या 22 जणांमध्ये स्पा मालक संतोष शेरेकर याचंही नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
सॉफ्ट टच स्पाचा मालक संतोष शेरेकर हा गुरु वाघमारेच्या वसुलीच्या धमक्यांना कंटाळला होता आणि त्यामुळे त्याने गुरु वाघमारे यांच्या हत्येचा कट रचल्याचं पोलिसांनी सांगितलं. 26 वर्षीय मोहम्मद फिरोज अन्सारी याला 6 लाख रुपयांची सुपारी दिली होती. अन्सारीचा नालासोपारा येथेही एक स्पा होता. हा स्पा गुरु वाघमारेच्या तक्रारीनंतर छापा टाकून बंद करण्यात आला होता. फिरोज अन्सारी याने संतोष शेरेकरला गुरु वाघमारेच्या वसुली आणि स्पाबद्दलच्या तक्रारीबाबत सांगितलं. त्यानंतर संतोष शेरेकरने गुरु वाघमारेच्या हत्येचा कट रचला. यानंतर फिरोज अन्सारीने दिल्लीत राहणाऱ्या साकिब अन्सारी यांच्याशी संपर्क साधला. हा संपूर्ण कट तीन महिन्यांपूर्वीच रचण्यात आला होता.   
गुरू वाघमारे यांच्या हत्येपूर्वी तीन महिने रेकी केली गेली. फिरोज अन्सारीने पूर्ण नियोजन करून संतोष शेरेकरच्या स्पामध्ये गुरु वाघमारेच्या हत्येचा प्लॅन आखला. वाघमारेने जिथे वाढदिवस साजरा केला त्या बारच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले. या सीसीटीव्हीमध्ये रेनकोट घातलेले दोन हल्लेखोर वाघमारे यांचा पाठलाग करत असून, दोघेही स्कूटरवरून संतोष शेरेकर यांच्या स्पामध्ये पोहोचल्याचं दिसून आलं. यापैकी एक बारजवळील पान टपरीवर जातो आणि दोन गुटख्याची पाकिटं विकत घेतो. त्याचे पैसे तो युपीआयने देतो, त्या युपीआय रेकॉर्डवरून त्याचे नाव मोहम्मद फिरोज अन्सारी असल्याचे समोर आले. फिरोज अन्सारीच्या यूपीआय आयडीच्या फोन नंबरवरून स्पा मालक संतोष शेरेकर यांना अनेक कॉल करण्यात आल्याचं तपासात समोर आले आणि या घटनेचा उलगडा झाला.
सात हजाराच्या कैचीने हत्या : फिरोज आणि साकिब अन्सारी स्पामध्ये पोहोचतात, ते गुरु वाघमारेच्या गर्लफ्रेंडला दुसऱ्या खोलीत घेऊन जातात आणि वाघमारेवर ₹ 7000 रुपये किमतीच्या कात्रीच्या वेगवेगळ्या ब्लेडने वार करतात. त्यापैकीच एका ब्लेडने त्याचा गळा कापण्यात आला, तर दुसऱ्या ब्लेडने पोटात वार करण्यात आले. याप्रकरणी पोलीस वाघमारेच्या गर्लफ्रेंडचीही चौकशी करत आहेत. तर शेरकरला अटक करण्यात आली आहे. फिरोज अन्सारी याला नालासोपारा येथून गुन्हे शाखेने अटक केली, तर साकीब अन्सारी याला राजस्थानमधील कोटा येथून नवी दिल्लीला जात असताना अन्य दोघांसह ताब्यात घेतले. या लोकांचाही या कटात सहभाग असल्याचा संशय आहे. पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली आहे.

Maharashtra Mumbai Spa Murder Case Secret Revealed Guru Waghmare Tattooed 22 Name Of Enemies On Body

Mumbai Worli Murder Case

Mumbai Spa Murder Case

शरीरावर 22 जणांच्या नावाचे टॅटू, यापैकीच एक खुनी;
मुंबई स्पा हत्याकांडचं भयंकर गुपित उलगडलं

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm