बेळगाव—belgavkar—belgaum : महांतेशनगर येथील कनकदास सर्कल ते उज्ज्वलनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणावर महापालिकेने हातोडा चालविला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली असून शुक्रवारी पुन्हा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सदर रस्त्याचे मोजमाप करण्यात आले.
शहर आणि उपनगरातील अनेक ठिकाणी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण झाल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अतिक्रमण हटविण्यासंदर्भात संबंधितांना महापालिकेकडून अनेकवेळा सूचना करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दुकानाव्यतिरिक्त गटार आणि रस्त्यावर अतिक्रमण केले जात असल्याने रस्त्यांची रुंदी कमी होत आहे. त्यामुळे आता ही बाब महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे.
महांतेशनगर येथील कनकदास सर्कल ते उज्ज्वलनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला दुकाने थाटण्यात आली आहेत. संबंधित दुकानदारांनी दुकानाबाहेर रस्त्यावर काँक्रिट घालून अतिक्रमण केले होते. ही बाब लक्षात येताच गुरुवारी महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक जेसीबीसह त्याठिकाणी दाखल झाले. यावेळी कोणत्याही प्रकारची वादावादीची घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तदेखील मागविण्यात आला होता. जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यात आले. त्यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनीही सदर रस्त्याचे मोजमाप केले. अशा प्रकारे अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले असून ते हटविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
