हा राहुल सोलापूरकर कोण? शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या लोकांना गोळ्या झाडल्या पाहिजेत, अशा तीव्र शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केलाय. मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावरून राज्यभरात त्याचा निषेध करण्यात आला. आता छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी सोलापूरकर यांना कडक शब्दात सुनावलंय.
खासदार उदयनराजे भोसले हे एका पत्रकार परिषदेत बोलत होते. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका टीव्ही शोमध्ये औरंगजेबच्या कैदेतून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच दिली होती, असं विधान केलं होतं. त्याप्रकरणी राज्यभरात त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आली होती. सोलापूरकर यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. महाराजांबद्दल बोलणाऱ्यांची जीभ हासडून काढली पाहिजे,असंही उदयनराजे म्हणालेत.
छत्रपतींनी कधीच आपल्या विचाराची तडजोड केली नाही, अशा महान छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केली जातात, हे खेदजनक आहे. दोन-तीन दिवसापूर्वी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी महाराजांविषयी वाईट वक्तव्य केलं. असं विधान करणारे राहुल सोलापूरकर कोण? छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना त्यांनी लाच शब्दप्रयोग केला. जे लोक लाच घेतात तेच हे शब्द उच्चारत असतात. पण उचलली जीभ लावली टाळाला अशा लोकांची जीभ हासडून घेतली पाहिजे, उदयनराजे भोसले म्हणालेत.
जाती-धर्मात जे तेढ निर्माण केली जाते ते अशा विकृतीमुळे होत असतं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी असं विधान करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आपण मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं उदयनराजे भोसले म्हणालेत. याप्रकरणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याशी बोलणार असल्याचं ते म्हणालेत.
चित्रपट हाणून पाडा : जे कोणी अभिनेते असे विधान करत असतील, ते कोणत्या चित्रपटात काम करत असतील ते चित्रपट हाणून पाडली पाहिजेत. तसेच फिल्मी इंडस्ट्रीत काम करणाऱ्यां लोकांनीही अशी विधाने करणाऱ्यांना काम द्यायला नको.