बेळगाव—belgavkar—belgaum : जत (सांगली) : जत-बिळूर रस्त्यावर बेकायदेशीर 29 जनावरांची एका टॅम्पोमधून चारा व पाण्याची सोय न करता अपुऱ्या जागेत दाटीवाटीने क्रूरपणे छळ करीत वाहतूक करीत असल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी घडला. याबाबत पोलिसांनी 10 जणांवर प्राण्यांना क्रूरपणे वागणूक देणे व मोटार वाहन अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी संशयित मानतेश यल्लप्पा मोरे (30, रा. उंचाळ, ता. गोकाक, जि. बेळगाव), प्रकाश शिवाप्पा पाटील (30, रा. आडीबट्टी, ता. गोकाक, जि. बेळगाव), हणमंत परसाप्पा आरेर (36, रा. मसगुपी, ता. मुडलगी, जि. बेळगाव), बसवराज बुडाप्पा बेळबी (28), रमेश सुभाष कोडलीकार(24) शिवानंद लिंगाप्पा बेळवी (27), विठ्ठल मल्लाप्पा दंडील (27) सिद्दाप्पा रामलिंगाप्पा वडरगावी (30), नागराज बसवराज मानगी (30, रा. ममदापूर, ता. गोकाक, जि. बेळगाव), मानतेश गंगाच्या पटसुंदी (28, रा. मालदिनी, ता. गोकाक, जि. बेळगाव, कर्नाटक) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल सुयोग कोकाटे यांनी जत पोलिसात दिली आहे.
जत-बिळूर रस्त्यावर दोन टॅम्पोमधून जनावरांना नेताना क्रूरपणे वागणूक दिली जात असल्याची माहिती जत पोलिसांना मिळाली. या टॅम्पोमध्ये 29 जनावरे मिळून आली. पोलिसांनी जनावरे ताब्यात घेऊन कराड येथील कोंडवाड्यात सोडली. जत पोलिस तपास करीत आहेत.