बेळगाव—belgavkar : बेळगाव रेल्वेस्थानकावर एटीएम सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. याबाबत अनेक बँकांशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. तरीही तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाईल, असे पत्र नैऋत्य रेल्वेने महाराष्ट्र एकीकरण युवा समितीला दिले आहे.
बेळगाव रेल्वेस्थानकावर तसेच स्थानकाच्या परिसरात एटीएम केंद्र नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे एटीएम सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे रेल्वेच्या हुबळी येथील विभागीय व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे आठ दिवसांपूर्वी केली होती.
'बेळगाव स्थानकावर एटीएम केंद्र सुरू करण्याबाबत नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागीय कार्यालयाकडे आलेल्या तुमच्या तक्रारीच्या दखल घेतली आहे. या कार्यालयाने रेल्वेस्थानकावर एटीएम केंद्र सुरू करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले; परंतु बँकांकडून कोणतीही ऑफर मिळालेली नाही. तरी तुमच्या तक्रारीची दखल पुन्हा एकदा घेतली जाईल आणि बेळगाव येथे एटीएम केंद्र बसविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,' अशा आशयाचा ई-मेल युवा समितीला मिळाला आहे.
बेळगाव रेल्वेस्थानकावर प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. स्थानकावर परराज्यांतून नागरिकही मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. त्यांना एटीएमची शोधाशोध करावी लागते. त्यामुळे प्रवाशांची धावपळ होते. यापूर्वी रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरण करताना एटीएम काढले. मात्र, अद्याप तेथे नवीन एटीएम केंद्र सुरू केलेले नाही. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. बेळगाव शहरात अनेक राष्ट्रीयीकृत बँका आहेत. त्यांच्याशी रेल्वेने चर्चा केली आहे. तरीही बँकांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, नैऋत्य रेल्वेने पुन्हा पुढाकार घेऊन स्थानकाच्या आवारात एखाद्या बँकेचे एटीएम केंद्र सुरू करावे, अशी मागणीही होत आहे.