बेळगाव : नाराज जारकीहोळींशी 'नाश्ते पे चर्चा'

बेळगाव : नाराज जारकीहोळींशी 'नाश्ते पे चर्चा'

belgavkar.com | belgaum | belgavkar

भाजप प्रदेशाध्यक्षपदी विजयेंद्र यांची नियुक्ती झाल्यानंतर

बेळगाव—belgavkar : भाजप प्रदेशाध्यक्षपदी विजयेंद्र यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्षात नाराज असणाऱ्या नेत्यांना चुचकारण्याचे प्रयत्न आता प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सुरू केले आहेत. गोकाकचे नाराज आमदार रमेश जारकीहोळी यांच्या घरी धाव घेत विजयेंद्र यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. तर येडियुराप्पा यांनी रमेश यांच्याशी फोनवरून संवाद साधत सहकार्य करण्याची विनंती केली. जारकीहोळी यांनीही नाराजी दूर झाली असून, नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कार्यरत राहू, असे सांगितले.
गेल्या आठवड्यात झालेल्या प्रदेशाध्यक्ष निवडीच्या बैठकीतून आमदार रमेश जारकीहोळी, आमदार बसवराज पाटील-यत्नाळ, अरविंद बेल्लद आदी नेते बाहेर पडले होते. तसेच काही नेते बैठकीला आलेच नव्हते. जारकीहोळी, यत्नाळ यांनी बैठकीतून बाहेर पडल्यावर प्रदेशाध्यक्षांच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पक्षात आलबेल नसल्याचे दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी आमदार रमेश जारकीहोळी यांच्या बंगळूर-सदाशिवनगरातील निवासस्थानी भेट घेवून त्यांच्यासोबत न्याहरी केली.
विजयेंद्र यांनी जारकीहोळींची मनधरणी केली. आपण ज्येष्ठ असून तुमचे मार्गदर्शन आवश्यक आहे. लहानसहान मतभेद असले तरी ते विसरुन पक्षहितासाठी सहकार्य आवश्यक आहे, असे विजयेंद्र यांनी जारकीहोळींना सांगितले. विधानसभा निवडणुकीतील पराभवाने अनेकजण दुखावले आहेत. लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी तुमचे मार्गदर्शन, सहकार्य गरजेचे आहे. तुमच्या सूचनेनुसार कार्य करूया, अशा शब्दांत विजयेंद्र यांनी जारकीहोळींशी संवाद साधला. तत्पूर्वी येडियुराप्पा यांनी जारकीहोळींना फोन करून सहकार्य करण्याची विनंती केली. राज्यात पक्ष बळकट करण्यासाठी तुमचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनीही सांगितले.
भेटीनंतर जारकीहोळी म्हणाले, तुम्हाला अध्यक्ष करण्यास माझा विरोध नाही. परंतु, राज्यातील नेत्यांबरोबर चर्चा करून निर्णय जाहीर करणे आवश्यक होते. मागे अडचणीच्या काळात मी येडियुराप्पा यांच्याबरोबर होतो. यापुढेही त्यांच्यासोबत राहणार आहे. कोणताही निर्णय पक्षाच्या व्यासपीठावर घेतला जाणे आवश्यक आहे. कोणाच्याही दबावाला बळी पडून निर्णय घेण्यात येऊ नये. प्रत्येकाला विश्वासात घ्या. पक्ष संघटनेवर भर द्या. तुमच्यासोबत आम्ही आहोत. कोणतेही मतभेद असले तरी वरिष्ठांनी घेतलेला निर्णय स्वीकारत आहोत. आगामी काळात विजयेंद्र यांना पक्ष संघटनेसह सर्व कार्यात सहकार्य करू. लहानसहान मतभेद चर्चा करून सोडवण्यात येतील. मी, माजी मंत्री व्ही. सुनीलकुमार, बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी बैठक घेऊन चर्चा केली आहे. आम्ही पक्षासोबत आहे. आगामी काळात राज्यात भाजपला निश्चितच चांगले दिवस येतील.

Karnataka BJP president BY Vijayendra meets Ramesh Jarkiholi

Karnataka BJP president Vijayendra pacifies ‘upset’ Ramesh Jarkiholi

Yediyurappas son Vijayendra Karnataka BJP president

Karnataka BJP president Vijayendra meet Ramesh Jarkiholi

बेळगाव : नाराज जारकीहोळींशी 'नाश्ते पे चर्चा'
भाजप प्रदेशाध्यक्षपदी विजयेंद्र यांची नियुक्ती झाल्यानंतर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm