महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिल्यानंतर टाळी वाजवू लागले CMबिहारचे नितीशकुमार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. गांधीजींना श्रद्धांजली अर्पण करून झाल्यानंतर नितीशकुमार टाळी वाजवू लागल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.
बिहारची राजधानी पटना येथील गांधी घाटवर ही घटना घडली. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील इतर नेतेही उपस्थित होते. विधानसभा अध्यक्षही तिथे होते. त्यांच्यामुळे नितीशकुमारांवरील मोठा प्रसंग टळला आहे. झाले असे की गांधीजींच्या स्मृतींसाठी दोन मिनिटांचे मौन ठेवण्यात आले होते. मौन जसे संपले तसे नितीशकुमार टाळ्या वाजवू लागले. विधानसभा अध्यक्ष नंदकिशोर यादव यांनी त्यांना लगेचच रोखले. परंतू हा प्रसंग तिथे उपस्थित लोकांच्या कॅमेरामध्ये कैद झाला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नितीशकुमार आता वयोवृद्ध झाल्याची टीका त्यांच्यावर होऊ लागली आहे. आक्रस्ताळे निर्णय घेण्यासाठी ते प्रसिद्ध होतेच, विधानसभेतही ते अनेकदा अचानक भडकायचे. जीतनराम मांझी यांच्यावर तर त्यांनी खूप जहरी टीका केली होती. आता त्यांच्या या विक्षिप्त वागण्यावरही टीका होऊ लागली आहे. राजदचे नेते सुनील सिंह यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आता फक्त देवच बिहारचा स्वामी आहे. जर एखाद्या राज्याच्या प्रमुखाने असे कृत्य केले तर त्याबद्दल काय म्हणता येईल? नितीश कुमार मानसिकदृष्ट्या आजारी झाले आहेत. त्यांनी स्वतःहून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. भाजपच्या दबावाखाली ते भरकटले आहेत. बिहार विधानसभेच्या अध्यक्षांनी नितीश कुमार यांना थांबवले. आम्हाला जाणून घ्यायचे आहे की नितीश कुमार यांना काय झाले आहे, असे राजदचेच आणखी एक नेते मृत्युंजय तिवारी यांनी विचारले आहे.