Belgaum Urban Development Authority (BUDA) has invited tender for Development of Residential Layout at scheme no.61, Kanabargi, Belgaumबेळगाव—belgavkar—belgaum : बहुप्रतिक्षीत कणबर्गी निवासी योजना क्र. 61 साठी अखेर बुडाकडून फेरनिविदा काढण्यात आल्या आहेत. 94 कोटी 6 लाखांची ही निविदा असून 79 लाख 71 हजार रुपयांची अनामत ठेकेदाराला भरावी लागणार आहे. निविदा निश्चित झाल्यानंतर 2 वर्षांत निवासी योजनेचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे गेल्या 16 वर्षांपासून रखडलेली योजना मार्गी लागणार असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
कणबर्गी येथे निवासी योजना राबविण्यासाठी बुडाकडून शेतकऱ्यांची 168 एकर जमीन 16 वर्षांपूर्वी संपादित करण्यात आली आहे. यापैकी काही शेतकरी न्यायालयात गेले असल्याने 29 एकर जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट आहे. जमिनीचा वाद उच्च न्यायालयात निकाली लागला असून आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र 130 एकरमध्ये बुडाकडून निवासी योजना राबविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अद्यापही भूखंड विकसित करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे गेल्या 16 वर्षांपासून स्कीम क्र. 61 साठी जमीन दिलेले शेतकरी विविध समस्यांना तोंड देत आहेत. जमिनीत पीकही नाही आणि अद्याप भूखंडही नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भूखंड विकसित केल्यानंतर जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना 50 टक्के भूखंड देण्याची योजना सरकारची आहे. मात्र सदर योजना 16 वर्षांपासून रेंगाळली असल्याने तातडीने भूखंड विकसित करण्यात यावेत, या मागणीसाठी शेतकरी सातत्याने बुडासमोर आंदोलन करण्यासह पाठपुरावा करत आहेत.
18 जानेवारी रोजी झालेल्या बुडाच्या बैठकीत कणबर्गी निवासी योजना 61 साठी फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवार दि. 24 रोजी बुडाकडून सदर योजनेसाठी 94 कोटी 6 लाखांची निविदा काढण्यात आली आहे. या निविदेत भाग घेणाऱ्या ठेकेदाराला बुडाकडे 79 लाख 71 हजार रुपयांची अनामत रक्कम ठेवावी लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीने निविदा प्रक्रियेत भाग घेता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या असून दोन वर्षांत ही योजना पूर्ण केली जाणार आहे.
सध्या बुडाकडून सदर जागेवर आरेखन, सीमा निश्चिती आणि जागेचा कब्जा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरेखन, कणबर्गी येथील योजना क्र. 61 साठी शुक्रवार दि. 24 रोजी फेरनिविदा मागविण्यात आली आहे. निविदा निश्चित झाल्यानंतर दोन वर्षांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. सध्या आरेखन, सीमा निश्चिती आणि कब्जा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.- शकील अहमद, बुडा आयुक्त