harassment by microfinance companies over unpaid debtsबेळगाव—belgavkar—belgaum : मायक्रो फायनान्स कंपन्या संस्थांकडून कर्जदारांचा छळ रोखण्यासाठी वसुलीतील गुंडगिरीविरुद्ध अध्यादेश आणण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीला वसुली करता येणार नाही. तसेच सायंकाळी 5 वाजल्यानंतर वसुलीवर बंदी घातली आहे. कर्जवसुलीच्या नावाखाली मायक्रो फायनान्स संस्थांकडून होणारा गैरव्यवहार आणि फसवणूक रोखण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी सांगितले.
कर्जवसुलीच्या छळामुळे पंधरवड्यात राज्यभरात आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे सरकारला ही उपाययोजना करावी लागली आहे. बंगळूरमध्ये शनिवारी मुख्यमंत्री सिध्दरामय्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत अध्यादेशाचा निर्णय झाला. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. बैठकीला गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, कायदामंत्री एच. के. पाटील, मंत्री कृष्णा बैरेगौडा, मुख्य सचिव शालीनी रजनीश आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, सायंकाळी पाच वाजल्यानंतर कर्जवसुलीसाठी गुंडांचा वापर केला जातो. यापुढे कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीला वसुली करता येणार नाही. तशा सूचना आम्ही नाबार्ड, मायक्रो फायनान्स संस्था आणि सावकारांना दिल्या आहेत. जर त्यांनी कर्जवसुली करताना कायद्याचे उल्लंघन केले तर आम्ही यासाठी नवीन कायदा करू. परवान्याशिवाय कोणीही सावकारी करू नये, यासाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तिथे तक्रारी करता येतात. आम्ही पोलिस विभागाला तक्रार नोंदवण्याची तसेच खटले दाखल करण्याच्या सूचना केली आहे.
हे झाले निर्णय : बळजबरीच्या कर्जवसुलीविरुद्ध अध्यादेश त्रयस्थ व्यक्तीला वसुलीचा अधिकार नाही सायं. 5 नंतर वसुली करता येणार नाही जास्तीत जास्त व्याज दर 17.07 टक्के यापेक्षा जास्त व्याज आकारता येणार नाही आंध्रच्या कायद्याचा अभ्यास करणार