लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या 'छावा' या चित्रपटाची सर्वत्र प्रचंड चर्चा होती. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. 22 जानेवारी रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र असं असताना चित्रपटाच्या ट्रेलरवरून नवीन वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या तोंडून एक शब्द वगळल्याने आता नेटकरी प्रश्न उपस्थित करत आहेत.
लक्ष्मण उतेकर यांच्या 'छावा'ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील बऱ्याच गोष्टी चाहत्यांना आवडल्या. मात्र त्यातील काही गोष्टी चाहत्यांना खटकल्या देखील. त्यातील एक सगळ्यात गोष्ट म्हणजे विकीच्या तोंडी असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य. बालपणापासून अनेक इतिहासकारांनी लिहिलेल्या गोष्टी आपण ऐकत आलो. त्यात 'हे हिंदवी स्वराज्य व्हावे, हीच श्रींची इच्छा' हे वाक्य अनेकदा आपल्या कानावर पडलं. मात्र ट्रेलरमध्ये संभाजी महाराजांच्या तोंडून हे वाक्य शिताफीने वगळण्यात आलंय. यावरूनच आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
अनेक पुस्तकांमध्ये 'हे हिंदवी स्वराज्य व्हावे, हीच श्रींची इच्छा' हे वाक्य असताना विकी ट्रेलरमध्ये फक्त 'हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा' असं म्हणतो. 'हिंदवी' हे वाक्य वगळल्यावरून आता सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. दिग्दर्शक उतेकर यांना नेटकरी जाब विचारत आहेत. हे स्वराज्य महाराजांचं होतं ते हिंदवी स्वराज्य होतं, हिंदवी हा शब्द कुठेय? तुम्ही अगदी शिताफीने महाराजांच्या तोंडचं वाक्य बदललंय, असं म्हणत नेटकरी आपला राग व्यक्त करताना दिसतायत.
दिग्दर्शक उतेकर यांना नेटकरी जाब विचारत आहेत. हे स्वराज्य महाराजांचं होतं ते हिंदवी स्वराज्य होतं, हिंदवी हा शब्द कुठेय? तुम्ही अगदी शिताफीने महाराजांच्या तोंडचं वाक्य बदललंय, असं म्हणत नेटकरी आपला राग व्यक्त करताना दिसतायत. यासोबतच महाराजांच्या राज्याभिषेकावेळी संभाजी महाराज नाचताना दाखवण्यात आले आहेत. हे चुकीचं असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. ते राजे होते. स्वतःच्या राज्याभिषेकावेळी ते असं नाचताना दाखवून तुम्हाला काय सिद्ध करायचंय असा प्रश्नही नेटकरी विचारतायत. सोबतच रश्मिका चित्रपटात महाराणीच्या भूमिकेत दिसतेय. मात्र तीदेखील नृत्य करताना दाखवण्यात आलीये. महाराणी येसूबाई महाराणी होत्या. त्या अशा सगळ्यांसमोर नाचल्या असतील का? असा साधा विचार दिग्दर्शकाच्या मनात का आला नाही असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. नेटकरी या ट्रेलरमधील खटकलेल्या गोष्टींचा जाब दिग्दर्शकाला विचारत आहेत. आता निर्माते यात काही बदल करणार का हे पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.