बेळगाव—belgavkar : सीमाभागातील मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी निघणाऱ्या काळा दिनाच्या निषेध फेरीत सहभागी होण्यासाठी बेळगावला येण्याबाबतचे पत्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पाठविले आहे. फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातील इतर नेत्यांनाही पत्र पाठवून निषेध फेरीत सहभागी होऊन मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले आहे. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम आदींनी हे पत्र पाठविले आहे.
पत्रात म्हटले आहे की, 1 नोव्हेंबर 1956 रोजी बेळगावसह 865 गावे अन्यायाने कर्नाटकात डांबली, तेव्हापासून सीमाभागातील मराठी माणूस महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढा देत आहे. या अन्यायी घटनेचा आणि केंद्राच्या कृतीचा निषेध म्हणून 1 नोव्हेंबर 'काळा दिवस' म्हणून पाळला जातो. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संपूर्ण सीमाभाग 66 वर्षांपूर्वी कर्नाटकात डांबण्यात आला. अनेक वर्षे उलटली तरी भाषावर प्रांतरचनेला अद्यापही विरोध आहे. त्यामुळेच न्यायालयीन लढायासोबतच रस्त्यावरचीही लढाई सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवार 1 नोव्हेंबर रोजी विराट सायकल फेरी काढून पुन्हा एकदा मराठी अस्मिता दाखवून देण्यात येणार आहे. बेळगाव शहरात केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी सायकल फेरीचे आयोजन केले जाते.
आजतागायत महाराष्ट्राने आमचे पालकत्व स्वीकारून सीमावासीयांच्या पाठीशी पक्षभेद विसरून एकजूट दाखवली होती; पण गेल्या काही निवडणुकांमध्ये काही नेतेमंडळींनी पक्षादेश पाळून बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांविरोधात प्रचार केला, त्यामुळे महाराष्ट्रातील पक्ष व नेतेमंडळी महाराष्ट्र एकीकरण समिती व मराठी भाषिकांविरोधात असल्याची भावना सीमाभागातील मराठी जनतेत निर्माण झाली आहे. सीमावासीयांच्या पाठीशी आहात हे दर्शविण्यासाठी 1 नोव्हेंबरला निषेध फेरीत सामील होण्यासाठी यावे.