बेळगाव : राष्ट्रीय महामार्ग-4 वर कोगनोळी येथील शेतकरी पेट्रोलपंपाजवळ मोटरसायकल व अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार झाल्याची घटना रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. बाळकृष्ण शिंदे (वय 20, रा. गिजवणे, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, बाळकृष्ण शिंदे हा निपाणीहून कोल्हापूरकडे जात होता. येथील शेतकरी पेट्रोलपंपाजवळ आल्यावर त्याच्या दुचाकीला (MH 09 FC 8340) अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत बाळकृष्ण शिंदे गंभीर जखमी झाला.
याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन कोगनोळी पोलीस स्टेशनचे साहाय्यक फौजदार एस. के. पाटील व विजय पाटील यांनी जखमीला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात पाठवले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी निपाणी मंडल पोलीस निरीक्षक संतोष सत्यनाईक व निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार बी. एस. तळवार यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.