राज्यात नेतृत्वबदलाचा संदेश पक्षश्रेष्ठींकडे रवाना; आमदारांच्या प्रयत्नांना मठाधीशांचे समर्थन.?

राज्यात नेतृत्वबदलाचा संदेश पक्षश्रेष्ठींकडे रवाना;
आमदारांच्या प्रयत्नांना मठाधीशांचे समर्थन.?

belgavkar.com | belgaum | belgavkar

मुख्यमंत्री येडियुराप्पा दिल्लीला जाणार

कर्नाटक प्रदेश भाजपमधील काही आमदारांना मुख्यमंत्री येडियुराप्पांचे नेतृत्व मान्य नसून त्यांना खाली खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. आता एक मठाधीश त्यांना सहकार्य करत असून इतर मठाधीशांचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न ते करत असल्याची माहिती मिळाली आहे. तर आमदारांनी नेतृत्वबदलाचा संदेश श्रेष्ठींना पाठवल्याचे समजते. कोरोना, अतिवृष्टी, डीजे हळ्ळी, केजे हळ्ळीतील दंगल, ड्रग्जमाफिया, मंत्रिमंडळ विस्तार, स्वकियांचे असहकार्य अशा स्थितीत सध्या मुख्यमंत्री येडियुराप्पा आहेत. त्यातच मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबतीत पक्ष वरिष्ठांकडून त्यांना कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. 21 सप्टेंबरपासून विधिमंडळ अधिवेशन सुरू होणार आहे. तोपर्यंत होणाऱ्या हालचालींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
सध्या प्रदेश भाजपमध्ये आमदारांचे दोन गट बंडखोरीच्या तयारीत आहेत. येडियुराप्पांचे नेतृत्व त्यांना मान्य नाही. त्यांच्याविरुद्ध पक्षश्रेष्ठींकडे संदेश रवाना करण्यात आला आहे. आता श्रेष्ठींच्या निर्णयाची प्रतीक्षा केली जात आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री येडियुराप्पा आणि मंत्री जगदीश शेट्टर यांनी दिल्ली दौरा केला होता. त्यांनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, नितीन गडकरी यांच्याशी मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा केली होती. राज्यातील नेतृत्वबदलाविषयी त्यांचा अभिप्राय जाणून घेतला होता. याविषयी त्यांनी पक्षश्रेष्ठींना कळवले होते.
मुख्यमंत्री शुक्रवारी दिल्लीला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा 17 सप्टेंबर रोजी दिल्लीला जाणार असल्याचे समजते. मात्र मंत्रिमंडळ विस्तार हाच त्यांच्या दिल्ली भेटीचा प्रमुख विषय असणार आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा मंत्रिमंडळ विस्ताराविषयी चर्चा करण्यासाठी शुक्रवारी दिल्लीला जात आहेत. याआधी ते गुरुवारी जाणार असल्याची माहिती मिळाली होती. पण, सध्या अधिवेशन सुरू असल्याने 18 सप्टेंबर रोजी श्रेष्ठींशी बैठक निश्चित झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासह विविध विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे.
दौऱ्यात येडियुरप्पा हे पंतप्रधान मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी. नड्डा यांची भेट घेतील. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होईल, परंतु प्रत्यक्ष मंत्रिमंडळ विस्तार विधिमंडळ अधिवेशनानंतरच होणार आहे. मुख्यमंत्र्यांवर लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी दबाव येत आहे. उमेश कत्ती यांच्यासारख्या नाराज आमदारांना शांत करण्यासाठी त्यांना किमान प्रयत्न करावे लागतील. त्यांच्या नियोजित दिल्ली दौऱ्यामुळे मंत्रिमंडळातील काही सदस्यांच्या मनात चलबिचल सुरू झाली आहे. आपली मंत्रिमंडळातून हाकालपट्टी होण्याची त्यांच्या मनात भिती आहे. मुख्यमंत्री राज्याच्या जीएसटीच्या वाट्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
येडीयुरप्पा यांचे पुत्र आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, गृहमंत्री बसवराज बोम्मई हेही त्यांच्यासोबत दिल्लीला जाणार असल्याचे समजते. पंतप्रधान मोदी यांच्या भेटीत येडीयुरप्पा पूर नुकसान भरपाईसाठी तातडीने मदत देण्याची विनंती करण्याची शक्यता आहे. रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रुग्णालयात पुन्हा दाखल झाल्याने त्यांची भेट घेण्याची येडियुरप्पांची योजना बारगळण्याची शक्यता आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

राज्यात नेतृत्वबदलाचा संदेश पक्षश्रेष्ठींकडे रवाना; आमदारांच्या प्रयत्नांना मठाधीशांचे समर्थन.?
मुख्यमंत्री येडियुराप्पा दिल्लीला जाणार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm