khanapur-three-hours-climbing-tree-saved-his-life-belgaum-heavy-rain-202008.jpg | बेळगाव : झाडावर 3 तास चढून वाचविला स्वत:चा जीव - पुराच्या पाण्यामुळे अडकलेल्या एकाची पोलिस आणि अग्निशमन दलाने केली सुटका | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : झाडावर 3 तास चढून वाचविला स्वत:चा जीव - पुराच्या पाण्यामुळे अडकलेल्या एकाची पोलिस आणि अग्निशमन दलाने केली सुटका

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : खानापूर तालुक्यात गेले चार दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. तालुक्यातील मलप्रभा नदीसह अन्य छोट्या नद्या आणि नाले भरून वाहत आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. याच अतिवृष्टीत झाडावर अडकून राहिलेल्या 65 वर्षीय वृद्धाची अखेर पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली आहे. पाणी कमी होतपर्यंत प्रतीक्षा केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्याच्याजवळ नव्हता. त्याच झाडावर 3 तास थांबून त्याने स्वत:चा जीव वाचविला. काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती. याचा प्रत्यय या वृद्धाच्या बाबतीत आला.

दोरीच्या सहाय्याने वृद्ध व्यक्तीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात खानापूर पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पोलीसांना यश आल्याने या कामाचे कौतुक होत आहे. पूल ओलांडताना मधेच अडकलेल्याला अग्निशामक दलाच्या जवानांनी सहीसलामत बाहेर काढल्याची घटना कापोलीत (ता. खानापूर) घडली. पांढा नदीच्या कापोली रामनगर दरम्यानचा पूल पाण्याखाली गेल्याने ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी, विलास दत्तात्रय देसाई ( वय 65) कामानिमित्त रामनगरला गेले होते. वृद्ध कापोलीला परतताना पांढा नदीचा पूल पाण्याखाली गेला होता. वृद्धाने पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याच्या प्रवाहामुळे वृद्ध पुलावर मधेच अडकला. याची माहिती तालुका प्रशासनाला मिळताच तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले.
अग्निशामक ठाणाधिकारी मनोहर राठोड यांच्या नेतृत्वाखाली बी. जी. बिजूर, आर. एम. बेपारी, उमेश खोत, बी. जी. तल्लूर यांनी घटनास्थळी जाऊन शिताफीने विलासला पाण्याबाहेर काढले. खानापूरला दर पावसाळ्यात पुराचा वेढा बसतो. आवश्यक कामानिमित्त गावकर्यांना जीव धोक्यात घालून बाहेर जावेच लागते. एखादा व्यक्ती पुरात अडकला असल्यास त्याला काढावे लागते. यासाठी ग्रामपंचायतीने तसेच इतर विभागाने नागरिकांना पुरापासून बचावाचे साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी खानापूरकरांनी केली आहे.