बेळगाव : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (शिवसेना) खासदार संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. खासदार संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. 2018 मध्ये खासदार राऊत एका खासगी कार्यक्रमासाठी बेळगावला आले होते. त्यावेळी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होती. त्या कार्यक्रमात राऊतांनी केलेल्या भाषणावर आक्षेप घेत त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणी बेळगाव न्यायालयानं राऊत यांना समन्स बजावले होते. त्या प्रकरणी बुधवारी सुनावणी झाली. राऊत यांच्या वतीनं अॅड. शामसुंदर पत्तार यांनी जामीन अर्ज दाखल केला होता, त्यावर आज (बुधवार) न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. या जामिनामुळं राऊतांना दिलासा मिळालाय.
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद चिघळला आहे, त्यामुळं महाराष्ट्रातील नेत्यांवर बेळगाव जिल्ह्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यातच महाराष्ट्रातील नेत्यांकडून वारंवार सीमाप्रश्नांबाबत वक्तव्य होत असल्यामुळं त्यांना कर्नाटक शासनामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.