man-who-gave-death-threat-to-rahul-gandhi-arrested-in-ujjain-20221127.jpg | 200 CCTV, 6 शहरं, लॉजवर छापे अन्…; राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा नरेंद्र सिंह सापडला | belgaum news | belgavkar बेळगावकर

200 CCTV, 6 शहरं, लॉजवर छापे अन्…; राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा नरेंद्र सिंह सापडला

belgavkar.com | belgaum | belgavkar

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये दाखल झाली आहे

राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी दिली होती

मध्य प्रदेश पोलिसांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी गुरुवारी या व्यक्तीला अटक केली असून या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांना बऱ्याच ठिकाणी तपास करावा लागला. मात्र पोलिसांच्या तपासाला यश आलं आणि ही व्यक्ती त्यांच्या जाळ्यात अडकली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दया उर्फ प्यारे उर्फ नरेंद्र सिंह असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. उज्जैनमधील नागदा परिसरामधून या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सध्या या व्यक्तीचा ताबा इंदूर पोलिसांकडे आहे. या व्यक्तीनेच राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
राहुल गांधी इंदूरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना बॉम्बने उडवून टाकू, असं या धमकीच्या पत्रात म्हटलं होतं. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये दाखल झाली आहे. याच यात्रेच्या पार्श्वभूमीवर हे पत्र लिहिण्यात आलं होतं. नरेंद्र सिंहला अटक करण्यासाठी पोलिसांनी जवळजवळ 200 सीसीटीव्ही तपासले. या सीसीटीव्हीमधील शेकडो फुटेज पोलिसांनी तपासून पाहिली. पोलिसांनी हॉटेल, रेल्वे स्थानके आणि लॉदवर छापेमारी केली. जवळजवळ सहा शहरांमध्ये पोलिसांची पथके राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तपास करत होती. या तपासाला काही दिवसांमध्ये यश आलं आणि नरेंद्र सिंह सापडला.
नरेंद्र हा मुळचा उत्तर प्रदेशमधील बरेलीचा रहिवासी आहे. त्याने यापूर्वीही अनेक नामवंत व्यक्तींना पत्राच्या माध्यमातून धमकावलं आहे असंही पोलिसांना सांगितल्याचं ‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरेंद्रने इंदूरमधील खालसा स्टेडियममधील काँग्रेसच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते कमलनाथही उपस्थित होते.