penalty-fine-traffic-police-cops-motor-vehicle-act.jpg | ट्रॅफिक पोलिसांबरोबर हुज्जत घालणे पडेल महागात, पोलिसांशी वाद घालणं भोवणार | belgaum news | belgavkar बेळगावकर

ट्रॅफिक पोलिसांबरोबर हुज्जत घालणे पडेल महागात, पोलिसांशी वाद घालणं भोवणार

belgavkar.com | belgaum | belgavkar

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मध्ये नवीन तरतुदी केल्या आहेत. या नव्या अधिनियमातील तरतुदींनुसार एखाद्या छोट्याशा चुकीमुळं तुमचं लायसन्स जप्त होण्याचीही शक्यता आहे. केंद्र सरकारने नवीन मोटार वाहन कायदा ( Motor Vehicle Rules) लागू केला आहे. देशभरात 1 ऑक्टोबरपासून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. वाहतूक पोलीस नव्या टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन, खासगी आणि व्यावसायिक वाहन चालकांवर नजर ठेवणार आहेत. त्याचबरोबर या नवीन सुधारित नियमांनुसार आरसी बुक, इन्शूरन्स आणि ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्यासोबत न बाळगता त्याची सॉफ्ट कॉपी सोबत ठेवली तरीही चालणार आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने (MoRTH)नुकतेच केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील विविध सुधारणेसंदर्भात अधिसूचना जारी केल्या आहेत.
वाहनांचे कागदपत्र आणि ई-चालानची योग्य देखभाल पोर्टलद्वारे करण्याची सुरुवात 1 ऑक्टोबर 2020 पासून होईल. असे MoRTH ने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर या नवीन तरतुदींनंतर पोलिसांची देखील जबाबदारी वाढली आहे. पोलिसांना त्यांच्या रोजच्या कामाची किंवा कारवाईची नोंद करावी लागणार आहे. विशेष म्हणजे ही नोंद कागदावर नसून ती वाहतूक शाखेच्या पोर्टलवर करावी लागणार आहे. यामध्ये पोलिसांना या ऑनलाईन पोर्टलवर दंडाची रक्कम, वाहन चालकांवर केलेली कारवाई, त्याची कारणं, या सगळ्याचा उल्लेख करावा लागणार आहे. रोजच्या रोज ही नोंद करावी लागणार आहे.  दंड केलेल्या ड्रायव्हरच्या वर्तनाचा उल्लेखही पोलिसांना पोर्टलवर करावा लागणार आहे. त्यामुळे भविष्यात कारवाई करताना पोलिसांना देखील सोपे जाणार असून वाहन चालकांना देखील नाहक त्रास होणार नाही.
या नवीन तरतुदींनुसार, पोलिसांनी एखाद्या वाहन चालकाला पकडल्यानंतर त्या वाहन चालकाचं वर्तन कसं आहे, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे पोलिसांशी हुज्जत घालणे, गाडी न थांबवणे अशा गोष्टींवर पोलीस कडक कारवाई करू शकतात. त्याचबरोबर ट्रकचालकांनी त्यांच्या केबिनमधून प्रवासी वाहतूक केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्याचबरोबर दारू पिऊन गाडी चालवणे, गाडी चालवताना सिगारेट ओढणे, या प्रकारांमुळे ड्रायव्हर अडचणीत येऊ शकतो. दरम्यान, या नवीन तरतुदींमध्ये गाडी चालवताना मोबाईलचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण यामध्ये केवळ गुगल मॅपचा वापर करण्यासाठी मोबाईलचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मोबाईल फोनवर गप्पा मारत गाडी चालवण्यास परवानगी नाही.
या नवीन तरतुदीनुसार  हुज्जत घातल्याने ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची कारवाई बरोबरच गाडीचे रजिस्ट्रेशनही रद्द करण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नवीन नियमांनुसार व्यावसायिक टॅक्सी किंवा प्रवासी वाहनांमध्ये बुकिंग होऊनही प्रवाशांना घेण्यास नकार, प्रवाशांना चुकीच्या ठिकाणी उतरवणे,  तसेच बसमध्ये प्रवाशांशी गैरव्यवहार केल्यास देखील कारवाई होऊ शकते. आयटी सेवांचा वापर आणि इलेक्ट्रॉनिक देखरेखीमुळे देशातील रहदारी नियमांची अंमलबजावणी चांगली होईल आणि त्यामुळे वाहनचालकांचा होणारा छळ दूर होईल आणि नागरिकांना मदत होईल, असेही या पत्रकात म्हटले आहे.