उद्यापासून सुरू होणार अधिक मास; वाचा, शास्त्र, महत्त्व व मान्यता

उद्यापासून सुरू होणार अधिक मास;
वाचा, शास्त्र, महत्त्व व मान्यता

belgavkar.com | belgaum | belgavkar

पितृपक्ष समाप्तीनंतर एक महिन्याने नवरात्रोत्सव

गणेशोत्सवानंतर भाद्रपद वद्य (कृष्ण) पक्षात पितृपक्षास प्रारंभ होतो. यानंतर आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रोत्सवास सुरवात होते. मात्र, या वर्षी आश्विन महिन्यात अधिकमास आल्यामुळे पंचांगात अधिक आश्विन आणि निज आश्विन असे दोन आश्विन महिने आले आहेत. मराठी पंचांगानुसार दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरला जातो व ते वर्ष तेरा महिन्यांचे असते. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास, संसर्प मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात. सूर्याधरित पंचांग पाळणाऱ्या आसाम, ओरिसा, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांत अधिक महिना नसतो. तो फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांत पाळला जातो. सन 2020 मधील अधिक मास केव्हापासून सुरू होणार? अधिक मास येण्याची पद्धत पूर्णपणे खगोलशास्त्रीय आहे. या खगोलीय घटनेवर माणसांचे नियंत्रण नसते. त्यामुळे या पद्धतीने अधिक मास येताना चूक होण्याची शक्यता खूपच कमी होते. त्यामध्ये माणूस ढवळाढवळ करू शकत नाही. अधिक महिन्यासंबंधीची, त्यामागच्या तर्कशुद्ध मांडणीची माहिती करून देणे आणि त्यानिमित्ताने आपल्या पूर्वजांनी खगोलीय घटना आणि दैनंदिन जीवन यांची सांगड किती कल्पकतेने घातली होती, हे यावरून लक्षात येते.
सन 2020 मधील अधिक मास : सन 2020 वर्ष अनेकार्थाने अद्भूत मानले गेले आहे. तब्बल 165 वर्षांनी सन 2010 या एकाच वर्षात लीप इयर आणि अधिक महिना आला आहे, असे सांगितले जाते. सन 2020 मध्ये शुक्रवार, 18 सप्टेंबर पासून अधिक महिन्याला सुरुवात होणार असून, शुक्रवार, 16 ऑक्टोबर रोजी संपेल. या वर्षीचा आणखी एक योग म्हणजे अधिक महिन्याची सुरुवात आणि सांगता शुक्रवारीच होणार आहे. सरासरी 32 महीने 16 दिवसांनी हा अधिक मास येतो. चैत्र ते अश्विन महिने अधिक वेळा, तर कार्तिक व फाल्गुन क्वचित अधिक येऊ शकतो. पण मार्गशीर्ष, पौष, माघ हे महीने कधीच अधिक येत नाहीत.
अधिक मासाला परुषोत्तम मास का म्हटले जाते? खगोलीय दृष्टिने अधिक मासाचे चलन कसे ठरवले जाते? पाहूया...

चातुर्मास 2020 : जीवनशैली, ऋतुचक्राशी निगडीत सात्विकतेचा काळ - ​पुरुषोत्तम महिना
भारतीय संस्कृती, परंपरा यांचा विचार केल्यास अधिक महिन्याला पुरुषोत्तम महिना संबोधले जाते. सन 2020 मध्ये अश्विन महिना अधिक आला आहे. त्यामुळे यंदाचा चातुर्मास पाच महिन्यांचा झाला आहे. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीचा काळ चातुर्मास म्हणून संबोधला जातो. अधिक मास हा श्रीविष्णूंना समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास म्हटले जाते. यासंदर्भातील एक कथा पुराणात आढळून येते. एका मान्यतेनुसार, प्रत्येक चांद्र महिन्याची एक देवता निश्चित करण्यात आली आहे. जरी अधिक महिना सूर्य आणि चंद्र महिन्यामध्ये संतुलन निर्माण करण्यासाठी असला, तरी ही या अतिरिक्त महिन्याचा अधिपती होण्यासाठी कोणतीही देवता तयार नव्हती. या परिस्थितीत ऋषी मुनींनी भगवान श्रीविष्णूंना विनंती केली की, त्यांनी या महिन्याचे भार स्वतःवर घ्यावा. श्रीविष्णूंनी विनंतीला मान दिला आणि अशा प्रकारे अधिक महिना पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला, अशी मान्यता आहे.
सौर आणि चांद्र कॅलेंडर : पृथ्वीवर होणारे ऋतुबदल हे सूर्यामुळे होत असतात. त्यामुळे सौर कालगणना महत्वाची ठरते. पण त्याचवेळी हेही खरे आहे की, सूर्याच्या स्थानबदलामुळे होणारे बदल सहज लक्षात येत नाहीत. त्यामुळे दैनंदिन जीवनचर्या ठरवत असताना सूर्यामधील बदल नोंदवून कालगणना करता येत नाही. चंद्राचा आकार आणि जागेतला बदल सहज नोंदवता येतो. त्यामुळे दैनंदिन व्यवहाराकरिता चंद्र उपयोगी ठरतो. हे लक्षात घेऊन जगभरातील अनेक संस्कृतींमधून दैनिक व्यवहाराकरता चांद्र तर वार्षिक व्यवहाराकरता सौर कॅलेंडर वापरले जाते. अशा प्रकारच्या कॅलेंडरला चांद्रसौर कॅलेंडर म्हणतात.
​सौर आणि चांद्र कॅलेंडरची सांगड : पृथ्वीची सूर्याभोवती एक फेरी म्हणजेच 365 दिवस 5 तास 48 मिनिटे आणि 43 सेकंदांनी पूर्ण होते. व्यवहाराच्या सोयीकरिता आपण 365 दिवसांनी नवे वर्ष सुरू करतो. दर चार वर्षांनी येणारे वर्ष एक वाढीव दिवस घेऊन 366 दिवसांचे 'लीप वर्ष' म्हणून स्वीकारतो. पृथ्वीभोवतीची चंद्राची एक फेरी म्हणजे 'चांद्रमास'. एक वर्षाच्या कालावधीत 12 चांद्रमास पूर्ण होतात, यालाच चांद्रवर्ष म्हणतात. चांद्रमास प्रतिपदा ते अमावास्या असा 29.5 दिवसांचा असतो. त्यामुळे चांद्रवर्ष 354 दिवसांचे होते. याचा अर्थ चांद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा 11 दिवसांनी लहान असते. हा फरक दरवर्षी वाढत राहू नये, याकरिता चांद्रवर्षामध्ये ठराविक कालावधीनंतर एक महिना वाढीव म्हणजेच 'अधिक' घेतला जातो आणि दोन्ही कॅलेंडर एकमेकांना जोडून घेतली जातात.
पृथ्वीवरून पहाताना सूर्य दररोज सरासरी एक अंश पुढे सरकल्यासारखा वाटतो. दर 30 दिवसांनी तो 30 अंशांची एक रास पुढे सरकतो. सूर्याच्या या राशीबदलाला 'सूर्यसंक्रांत' अथवा 'सूर्य संक्रमण' असे म्हणतात. हा कालावधी किमान 29 दिवस 10 तास 48 मिनिटे ते कमाल 31 दिवस 10 तास 48 मिनिटे एवढा असू शकतो. चांद्रमास हा शुद्ध प्रतिपदेला सुरू होऊन अमावास्येला संपतो. चांद्रमास किमान 29 दिवस 5 तास 44 मिनिटे ते कमाल 29 दिवस 19 तास 36 मिनिटे असतो. या कालावधीत एक तरी सूर्यसंक्रांत होते. चांद्रमास हा सूर्यमासापेक्षा नेहमी लहान असतो. याचा परिणाम म्हणून एखाद्या चांद्रमासात एकही सूर्यसंक्रांत होत नाही. या चांद्रमासाला 'असंक्रातीमास' म्हणजेच 'अधिक मास' म्हटले जाते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

उद्यापासून सुरू होणार अधिक मास; वाचा, शास्त्र, महत्त्व व मान्यता
पितृपक्ष समाप्तीनंतर एक महिन्याने नवरात्रोत्सव

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm