बेळगाव : उत्तर कर्नाटकाचे शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच महाराष्ट्र, गोवा कर्नाटकातील आराध्य दैवत असणाऱ्या सौंदत्ती रेणुका यल्लम्मा देवी मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी आणखी एक महिना बंदच ठेवले जाणार आहेत. ह्या महिन्यात भाविकांना दर्शन खुले होणार होते. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे जुननंतर एक महिना मंदिर बंद ठेवण्याचे बेळगाव जिल्हाधिकारी (डाॅ. एस. बी. बोम्मनहळ्ळी (निवृत्त) यांनी दिले होते.
त्यानंतर पून्हा आणखी एक महिना मंदिर बंद ठेवण्याचे बेळगाव जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ (नूतन) यांनी दिले आहेत. तसेच जोगुळभावी सत्यव्वादेवी मंदिर आणि चिंचली मायक्का देवी मंदिरही भाविकांच्या दर्शनासाठी बंद (31 ऑगस्टपर्यंत) ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
राज्य शासनाने यापूर्वी 8 जूनपासून राज्यातील सर्वच मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भाविकांच्या सुरक्षेची खबरदारी म्हणून सौंदत्ती यल्लम्मा मंदिराने 15 जूननंतर मंदिरात भाविकांना प्रवेश दिला जाणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, याचकाळात महाराष्ट्रातून आलेल्या नागरिकांमध्ये तसेच बेळगाव जिल्ह्यातही कोरोनाचा अधिक संसर्ग झाल्याचे दिसून आल्याने मंदिर ट्रस्टने नव्याने आदेश काढत 30 जुलैपर्यंत मंदिर बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता आणखी एक महिना म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.