बेळगाव : अज्ञात कारच्या धडकेत बसुर्तेचा युवक जागीच ठार झाला. सोमवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास गांधीनगरजवळ राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला. योगेश बाळकृष्ण मोरे (26, रा. बसुर्ते, ता. बेळगाव) असे मृताचे नाव आहे. वाहतूक उत्तर विभाग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, योगेशची आजी उज्वलनगर येथे राहते. योगेश अनेकदा आजीकडे येत होता. सोमवारी दुपारी आजीला भेटून कामानिमित्त तो उज्वलनगरहून गांधीनगरकडे चालत निघाला होता.
महामार्ग ओलांडताना भरधाव आलेल्या कारने त्याला उडवले. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच ठार झाला. यानंतर कारचालक न थांबता तसाच भरधाव निघून गेला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक उत्तर विभागाच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिस निरीक्षक कुंभार पुढील तपास करीत आहेत.
घटनास्थळावरील माहितीनुसार, एका तवेरा कारने या युवकाला धडक दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्या कारचालकाचा शोध पोलीस घेत आहेत.