game-changer-here-are-5-new-rules-which-could-benefit-or-hurt-teams-at-the-t20-world-cup-2022-icc-202210.jpeg | T20 वर्ल्ड कप स्पर्धेत हे 5 नवीन नियम ठरतील निर्णायक; कर्णधारांची कसोटी | belgaum news | belgavkar बेळगावकर

T20 वर्ल्ड कप स्पर्धेत हे 5 नवीन नियम ठरतील निर्णायक; कर्णधारांची कसोटी

belgavkar.com | belgaum | belgavkar

फलंदाज झेलबाद झाल्यानंतर येणारा नवा फलंदाज स्ट्राइक घेईल

Over Rate Penalty : अखेरच्या काही षटकांत संघाला 4 खेळाडूच 30 यार्डच्या बाहेर क्षेत्ररक्षणासाठी

ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2022 या कालावधीत वर्ल्ड कप पार पडणार आहे. एडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये 45 सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अ‍ॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे 9 व 10 नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर 13 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. पण, 1 ऑक्टोबरपासून नव्या नियमांची अंमलबजावणी होणार आहे आणि त्यापैकी 5 नवे नियम यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत निर्णायक ठरू शकतात..
मंकडिंग
गोलंदाजानं चेंडू टाकण्यापूर्वी नॉन स्ट्रायकर फलंदाज क्रिज सोडतात आणि गोलंदाजाकडून मंकडिंग केले जाते. त्यामुळे बराच वाद होतोय.. नुकतंच भारत-इंग्लंड महिला वन डे मालिकेत दीप्ती शर्माने निर्णायक सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजाला मंकडिंग बाद केले. आता आयसीसीने मंकडिंग हा शब्दच वगळला आहे आणि अनफेअर प्लेच्या यादीतून वगळून आता त्याला रन आऊट असेच म्हटले जाणार आहे. त्यामुळे गोलंदाज चेंडू टाकण्यापूर्वी नॉन स्ट्रायकरने क्रिजमध्येच रहावे, असे ICC नेच सुचवले आहे.

नवीन फलंदाज स्ट्राईकवर
फलंदाज झेलबाद झाल्यानंतर येणारा नवा फलंदाज स्ट्राइक घेईल. यापूर्वी चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावण्याआधी जर दोन्ही फलंदाजांनी खेळपट्टीच्या मध्यरेषा ओलांडली, तर नवीन फलंदाज नॉन स्ट्राइक एंडला जायचा. पण, आता नवा फलंदाजच स्ट्राइकवर असेल. त्यातही नव्या फलंदाजाला क्रिजवर येण्यासाठी 90 सेकंद एवढा निर्धारित वेळ देण्यात आला आहे. जर फलंदाजाने येण्यास विलंब केल्यास, प्रतिस्पर्धी कर्णधार टाईम आउटचं अपील करू शकतो.
फलंदाजाला पिचमध्येच रहावे लागणार
खेळताना फलंदाज आणि बॅट ही पिचच्या आतमध्येच असली पाहिजे. जर फलंदाजाने पिचच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला तर पंच त्या चेंडूला डेड बॉल घोषित करू शकतात. कुठल्याही चेंडूने फलंदाजाला पिचच्या बाहेर येण्यास भाग पाडले तर पंच हा चेंडू नोबॉल ठरवू शकतात.
फलंदाजाचे लक्ष विचलित केल्यास
फलंदाज स्कूप मारण्याचा प्रयत्न करताना स्लिपमधील खेळाडू लगेच जागा बदलण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. आता असे घडल्यास ते निहमबाह्य ठरवले जाईल. तसेच क्षेत्ररक्षक मुद्दाम फलंदाजाचे लक्ष विचलित करत असल्याचे अम्पायरला दिसल्यास फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 धावा दिल्या जातील आणि तो चेंडू डेड बॉल घोषित केला जाईल.
षटकांची गतीची वेळ पाळा अन्यथा...
आयसीसीने एक महत्त्वाचा नियम आणला आहे. आशिया चषक स्पर्धेत त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. त्यानुसार षटकांची गती संथ ठेवल्यास संघाला Over Rate Penalty बसेल. त्यानुसार अखेरच्या काही षटकांत संघाला 5 ऐवजी 4 खेळाडूच 30 यार्डच्या बाहेर क्षेत्ररक्षणासाठी उभे करता येईल. भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानला अखरेच्या तीन षटकांत या नियमाचा फटका बसला होता.