one-ton-of-rice-seized-near-prabhunagar-khanapur-belgaum-202210.jpg | बेळगाव : खानापूरात 1 टन तांदूळ जप्त, एकाला अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : खानापूरात 1 टन तांदूळ जप्त, एकाला अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव-खानापूर : प्रभूनगर येथे स्वस्त धान्य दुकानात पुरवण्यात येणारा एक टन तांदूळ जप्त करण्यात आला. जाफर मुजावर (रा. पिरनवाडी) हा आपल्या टाटा मॅक्सी कॅब (केए 22 सी 7568) या वाहनातून प्रभूनगर येथील स्वस्त धान्य दुकानातून विक्री केलेला तांदूळ एकत्रित करून बेळगावला घेऊन जात असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा खात्याला मिळाली.
त्यानुसार खानापूर तहसीलदार कार्यालयातील अन्न व नागरी पुरवठा खात्याचे अधिकारी इलियास मणेयार, खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे व त्यांच्या सहकार्‍यांनी प्रभूनगर येथील सर्व्हिस रस्त्यावर मुजावर याचे वाहन अडवून तपासणी केली. त्यात विनापरवाना अवैधरित्या वाहतूक करत असलेला तांदूळ मिळाला. याची सखोल चौकशी केली असता स्वस्त धान्य दुकानातून विक्री केलेला तांदूळ एकत्रित करून बेळगावला नेण्यात येत होता. जाफर मुजावर याच्याकडील एक टन तांदूळ जप्त करून खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. खानापूर पोलिसांनी मुजावर याला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.