बेळगाव : आर्थिक व्यवहारातून एकावर हल्ला

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव-खानापूर : निलगिरी झाडांच्या व्यवहारातून झालेल्या भांडणात कोयत्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजता लोकोळी गावच्या हद्दीतील नारायण पाटील यांच्या जमिनीत घडली. यात सुनील गंगाराम हलगेकर (वय 34, रा. तोपिनकट्टी ता. खानापूर) हा शेतकरी जखमी झाला. पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, नंदीहळ्ळी (ता. बेळगाव) येथील संशयित आरोपी कुलदीप मनोहर जाधव आणि हलगेकर यांच्यात निलगिरी झाडांचा आर्थिक व्यवहार होता. यातून त्यांचा घटनास्थळी वाद झाला.
रागाच्या भरात जाधव याने हलगेकर यांच्या पायावर कोयत्याने वार केला. जखमीचे काका नारायण मारुती हलगेकर यांनी खानापूर पोलिसांत तक्रार नोंद केली आहे.

सुनील हलगेकर हे निलगिरी वाहतुकीचा व्यवसाय करतात. एक महिन्यापूर्वी त्यांनी कुलदीप जाधव यांच्या शिवारातील निलगिरी लाकडाची खरेदी करून वाहतूक केली होती. लाकडाची किंमत त्यांनी कुलदीपला तेव्हाच अदा केली होती. पण आपले आणखी पैसे देणे शिल्लक असून ते पैसे कधी देणार अशी त्यांच्याकडे कुलदीप वारंवार विचारणा करत होता.
सुनील लोकोळी येथील नारायण पाटील यांच्या शेतात निलगिरी तोडणीचे काम करत होते. तेथे जाऊन कुलदीपने माझे पैसे कधी देणार अशी विचारणा करून कोयत्याने सुनीलच्या डाव्या पायावर वार केला. तसेच आठ दिवसात पैसे दिले नाहीत तर ठार मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार सुनीलच्या भावाने खानापूर पोलिसात दिली आहे. पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी पुढील तपास करत आहेत.