लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ साकारणार अयोध्येतील राम मंदीराची प्रतिकृती

belgavkar.com | belgaum | belgavkar

लालबागच्या राजासाठी यंदा साकारणार अयोध्या, कोरोना संकटानंतर होणार प्रचंड गर्दी

मुबंई : लाडक्या बाप्पाचे आगमन अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपले आहे. यामुळे सर्वत्र गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच मुंबईतील प्रसिद्ध मंडळापैकी एक आहे तो लालबागचा राजा. लालबागच्या राजाच्या आगमनाची तयारी देखील जय्यत तयारी सुरू आहे यंदा लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारणार आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई हे कलाकृती साकारत आहेत.
लालबागच्या राजा हा मुंबईसह देशविदेशातील करोडो गणेशभक्तांचे श्रध्दास्थान आहे. नवसाला पावणारा अशी ख्याती या लालबागच्या राजाची आहे. लालबागच्या राजाची प्रसन्न मूर्ती हे नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरते. यासह येथील देखावे देखील नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण आणि एका थीमवर आधारीत असतात. यंदा लालबागचा राजा मंडळ अयोध्येतील राम मंदीराच्या थीमवर आधारीत देखावा साकारणार आहे.
लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळात अयोध्येतील राम मंदीराची प्रतिकृती साकारली जाणार आहे. मंडळाच्या प्रवेशद्वारावरच राममंदीराची प्रतिकृती आणि प्रभु श्रीरामाची प्रतिमा असणार आहे. तर मुख्य मूर्तीच्या स्थापनेच्या ठिकाणी राममंदीराच्या घुमटची प्रतिकृती असणार आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्याकडून ही कलाकृती साकारण्यात येत आहे. यामुळे ही कलाकृती नक्कीच भव्य आणि आकर्षक असणार आहे.
दोन वर्षानंतर लालबागच्या राजाचे दर्शन
कोरोनामुळे मागील दोन वर्षात सर्व सणांवर निर्बंध होते. कोरोना काळात गणेश भक्तांना ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा सर्व सण व उत्सव धुमधडाक्यात साजरे करायचे असे निर्देश दिले आहेत. कोरोना काळाच्या दोन वर्षानंतर पहिल्यांदाच गणेशोत्सव निर्बंध मुक्त साजरा होत आहे. यामुळे तब्बल दोन वर्षानंतर भक्तांना लालबागच्या राजाचे दर्शन होणार आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक तासनंतास रांगेत उभं राहतात पण शेवटी राजाचे दर्शन घेतातच. यामुळे यंदा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.