controversy-over-organizing-ganeshotsav-at-eidgah-maidan-in-karnataka-202208.jpeg | कर्नाटकातील ईदगाह मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्याची हिंदू संघटनाची योजना; | belgaum news | belgavkar बेळगावकर

कर्नाटकातील ईदगाह मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्याची हिंदू संघटनाची योजना;

belgavkar.com | belgaum | belgavkar

मुस्लिम वक्फ बोर्डाचा आक्षेप

कर्नाटकातील राजकीय पारा सातत्याने तापलेला आहे. राजकीय हत्यांच्या तीन घटनांचे प्रकरण अद्याप थांबलेले नसतानाच बंगळुरूच्या चामराजपेट येथील ईदगाह मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्याची योजना हिंदू संघटना करत आहेत. परंतु मुस्लिम वक्फ बोर्ड व मुस्लिम समुदायाने ही जमीन वक्फची असल्याचा दावा केला आहे. काँग्रेस आमदार जमीर अहमद खान यांच्या म्हणण्यानुसार चामराजपेट ईदगाह मैदानावर कोणत्याही धर्माच्या कार्यक्रमास परवानगी दिली जाता कामा नये. खान म्हणाले, चामराजपेट ईदगाह मैदानावर स्वातंत्र्य दिनाचे आयोजन झाल्यास मी स्वत: उत्स्फूर्तपणे त्यात सहभागी होईल.
या प्रकरणात राज्याचे महसूलमंत्री आर. अशोक म्हणाले, स्वातंत्र्य दिन किंवा गणेशोत्सव साजरा करण्याबाबत अद्याप तरी काही अर्ज मिळालेला नाही. परंतु एखादी व्यक्ती किंवा संस्थेकडून तसा अर्ज आल्यास सरकार त्यावर जरूर विचार करेल. हिंदुत्ववादी संस्था सनातनने बंगळुरू महापालिकेकडे बंगळुरूतील ईदगाह मैदानावर स्वातंत्र्य दिन व गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी मिळावी असा अर्ज केला आहे. सनातन संस्थेचे भास्करन म्हणाले, चामरोजपेट मैदान एक सार्वजनिक ठिकाण आहे. मैदानावर कार्यक्रमाच्या आयोजनाला परवानगी देणारे जमीर खान स्वत:ला काय समजतात? या मैदानावरील अधिकारावरून आमचाही अर्ज बंगळुरू महापालिककडे सोपवण्यात आला आहे. त्यावर अद्याप निकाल आलेला नाही.
बंगळुरू महापालिकेने वक्फ बोर्डाला ईदगाह मैदानाबाबत दावा सांगणारी कागदपत्रे सादर करावीत, असे जाहीर केले आहे. परंतु ही संपत्ती महापालिकेची असल्याचा दावाही त्यांनी केला. वक्फ बोर्डाला दावा भक्कम करण्यासाठी ठोस कागदपत्रे सादर करावी लागतील.
1999 मध्येही हाच मुद्दा
1999 मध्ये भाजपला या मैदानावर ध्वजारोहण करण्याची परवानगी मिळाली नव्हती. मैदानाऐवजी वक्फ बोर्डाला दहा एकर जमीन देण्यात आली आहे. हे दोन एकरचे क्षेत्र क्रीडा मैदान म्हणून राखीव आहे.