belgaum-belgavkar-12-trap-cameras-and-7-cages-5th-day-of-search-to-capture-the-leopard-belgaum-202208.jpg | बेळगाव : दहाव्या दिवशीही बिबट्याची हुलकावणी | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : दहाव्या दिवशीही बिबट्याची हुलकावणी

belgavkar.com | belgaum | belgavkar

गोल्फ कोर्स मैदानातील बिबट्या

बेळगाव : जाधव नगर, गोल्फ मैदान परिसरात दहशत माजवलेल्या बिबट्याच्या शोधासाठी वन खात्याकडून दहाव्या दिवशीही प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळालेले नाही. त्याचबरोबर मोदगा येथील तरसाचा ही शोध करण्यात येत असल्याची माहिती वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. शनिवारी बिबट्या शोधमोहीम राबविण्यात आली. ड्रोन व कर्मचाऱ्यांच्या मदतीने शोध घेण्यात आला. पावसाचा जोर कमी झाल्याने शोध मोहिमेला गती देण्यात आली असल्याचे वन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र बिबट्याचा माग लागला नाही. गोल्फ मैदान परिसरात बिबट्याचा शोध घेण्यात आला आहे. मात्र कोणताच सुगावा मिळालेला नाही.
गोल्फ कोर्स मैदानातील बिबट्याच्या शोधासाठी वनखात्याच्या कर्मचार्‍यांनी शुक्रवारी 350 एकर परिसर पिंजून काढला आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात आढळून आलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनखात्याच्या कर्मचार्‍यांनी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. मात्र बिबट्याचा ठावठिकाणा हाती लागला नाही. त्यामुळे वन खाते आता पुढे कोणती कार्यवाही करणार, हे पाहावे लागणार आहे.
शुक्रवार 5 ऑगस्ट रोजी जाधवनगर येथे बांधकाम कामगारावर हल्‍ला केल्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पावसामुळे शोध मोहिमेत अडथळा निर्माण झाला होता. गुरुवारपासून शहर परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने वनखात्याने बिबट्याच्या तपासासाठी शोधमोहीम तीव्र केली आहे. गुरुवारी तीन ड्रोन कॅमेर्‍याच्या सहाय्याने शोध घेण्यात आला आहे. पण उंच वाढलेल्या झाडीमुळे ड्रोन कॅमेरे अपेक्षित ठिकाणी उतरवणे शक्य झाले नाही. त्यामुळे ड्रोनच्या शोधपथकालाही बिबट्याचा थांगपत्ता लागला नाही. यामुळेच वनखात्याच्या जवळपास 60 कर्मचार्‍यांनी गोल्फ मैदान परिसर शोधून काढला. सकाळी 7 वाजता सुरू करण्यात आलेली शोधमोहीम सायंकाळी 5 पर्यंत सुरू होती. मात्र, बिबट्याचा थांगपत्ता लागला नाही.