a-hand-grenade-was-found-at-nirmali-kund-chowk-in-ayodhya-202206.jpeg | अयोध्येत घातपाताचा कट? निर्मली कुंड चौकात सापडले डझनभर हातबॉम्ब | belgaum news | belgavkar बेळगावकर

अयोध्येत घातपाताचा कट? निर्मली कुंड चौकात सापडले डझनभर हातबॉम्ब

belgavkar.com | belgaum | belgavkar

अयोध्या हे देशातील संवेदनशील शहरांपैकी एक आहे.

अयोध्या : प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी असलेल्या अयोध्यानगरीत दहशतवादी कारवायांचा कट असल्याचा संशय आणखी बळावला आहे. असंख्य हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्ये (Ayodhya) त रविवारी जवळपास डझनभर हातबॉम्ब (Hand Grenade) सापडल्याने खळबळ उडाली आहे. या पवित्र भूमीतील वर्दळीच्या निर्मली कुंड चौक परिसरात हे हातबॉम्ब (हॅण्डग्रेनेड) आढळून आले. त्यामुळे अयोध्यानगरी ही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची शक्यता अधिक बळावली असून स्थानिक पोलिसांसह सर्वच सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. दहशतवादीविरोधी पथकही अधिक सतर्क झाले असून परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. हे हातबॉम्ब आणण्यामागे नेमका हात कोणाचा? याचा शोध घेण्यासाठी संशयितांची कसून चौकशी केली जात आहे.
अयोध्या हे देशातील संवेदनशील शहरांपैकी एक आहे. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तरप्रदेशमधील अयोध्या ही एक पवित्र भूमी आहे. प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर येथे उभारले जात आहे. याचदरम्यान या शहराच्या आवारात मोठ्या प्रमाणावर हॅण्डग्रेनेड सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. कँट भागातील लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रापासून तीन किलोमीटर अंतरावर झुडपात हे हॅण्डग्रेनेड सापडल्याचे सांगण्यात येत आहे, असे ‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. कुठलाही धोका घडून मनुष्यहानीला निमंत्रण मिळू नये म्हणून जप्त केलेले हॅण्डग्रेनेड सध्या नष्ट करण्यात आले आहे. ते कुठून आले याचा शोध घेण्याचा प्रयत्न उत्तरप्रदेश पोलीस करत आहेत. अयोध्येतील या हॅण्डग्रेनेडच्या जप्तीवर अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅंट परिसरातील निर्मली कुंड चौकात एका स्थानिक तरुणाला हातबॉम्ब पडलेला दिसला. तेव्हा त्याने लगेच त्या हॅण्डग्रेनेडबद्दल मिलिटरी इंटेलिजन्सला माहिती दिली. त्यानंतर आसपासच्या झाडाझुडपांमध्ये जवळपास 10 ते 12 हातबॉम्ब पडलेले होते. लष्कराने याची माहिती अयोध्या पोलिसांना दिली आणि हॅण्डग्रेनेड नष्ट करण्यात आले. या संदर्भात अयोध्येचे एसएसपी शैलेश पांडे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, डोगरा रेजिमेंटल सेंटरने पत्राद्वारे कँट पोलिस स्टेशनला हॅण्डग्रेनेड मिळाल्याची माहिती दिली. दुसरीकडे, लष्कराचे पीआरओ शंतनू प्रताप सिंग यांनी अशा कोणत्याही प्रकरणाची माहिती नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हॅण्डग्रेनेडच्या कारवाईबाबत अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.