कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील एका शासकीय शाळेत सहायक शिक्षक असलेले कुशल पाटील यांना नुकतेच सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. केंद्रीय रसायने व खते राज्यमंत्री भगवंत खुबा यांना अवेळी फोन करून त्यांच्याशी वाद घातल्याचे कारण देण्यात आले आहे. खतांची टंचाई असल्यामुळे खुबा यांना फोन करून तक्रार केल्याचा दावा पाटील यांनी निलंबनानंतर केला आहे. कर्नाटक शासकीय सेवा नियमानुसार पाटील यांच्यावर 17 जून रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बेजबाबदार आणि जाणिवपूर्वक मंत्र्यांचा फोन रेकॉर्ड करून तो सोशल मीडियात व्हायरल केल्याचा ठपका पाटील यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
दीपक पाटील लंबोरी यांनी कुशल पाटील यांची तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे. पाटील यांनी खुबा यांना 15 जून रोजी मध्यरात्री फोन केला. खतांच्या टंचाईबाबत त्यांच्याशी वाद घातला. फोनवरील संभाषण व्हायरल करून मंत्र्यांना बदनाम केल्याचा आरोप दीपक पाटील यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून तोपर्यंत कुशल पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.
माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांकडे शेतकऱ्यांच्या समस्या मांडणे हे माझे कर्तव्य आहे. मी शिक्षक असलो तरी माझे कुटुंब शेतकरी आहे. केंद्र सरकार आणि खुबा हे खतांची टंचाई नसल्याचा दावा करत आहेत. पण प्रत्यक्षा स्थानिक बाजारात खते मिळत नाहीत. ऑक्टोबर 2021 मध्ये आम्हाला बियाणे मिळवण्यासाठी तेलंगणाला जावे लागले होते. माझ्या कुटुंबाकडे दोन ठिकाणी 88 एकर जमीन आहे. आम्हाला 150 पिशव्या खते लागणार आहेत. पण केवळ एकच पिशवी मिळाली. आम्ही खुबा यांना मतं दिली आहे. त्यामुळे आमच्या समस्या त्यांना सांगणे हा आमचा अधिकार असल्याचे कुशल पाटील यांनी म्हटलं.
- मोठी दुर्घटना; 39 जवानांसह नदीपात्रात कोसळली बस, 6 जणांचा मृत्यू
- भाजप आमदार सुभाष सिंह यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
- India Independence Day 2022 : “भारताने जे ठरवलं, ते पूर्ण करून दाखवले, आता ‘पंचप्राण’ संकल्प करायचाय”: पंतप्रधान मोदी
- चक्क पाकिस्तानचा झेंडा घरावर फडकवला...! व्हिडीओ व्हायरल, आरोपीला अटक