eknath-devendra.jpeg | भाजप-शिंदे फॉर्म्युला ठरला...! इकडे मंत्री ते तिकडेही मंत्री होणार; | belgaum news | belgavkar बेळगावकर

भाजप-शिंदे फॉर्म्युला ठरला...! इकडे मंत्री ते तिकडेही मंत्री होणार;

belgavkar.com | belgaum | belgavkar

आणखी काही मंत्रिपदेही देणार

महाराष्ट्र  : राज्यात भाजप-एकनाथ शिंदे गट असे सरकार स्थापन झाल्यास महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या मंत्री असलेल्या व शिंदे गटात सामील झालेल्या सगळ्यांना मंत्रिपदे दिली जाणार आहेत. हा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती मिळत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील. या शिवाय शिंदे गटातील गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, दादा भुसे, उदय सामंत हे पुन्हा कॅबिनेट मंत्री होतील. संजय राठोड हे उद्धव ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री होते. तथापि, पूजा चव्हाण प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावे, अशी मागणी बंजारा समाजाच्या महंतांनी अलीकडेच ठाकरे यांना भेटून केली होती. आता फडणवीस-शिंदे सरकार आल्यास त्यांचे पुनर्वसन केले जाऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी तसे आश्वासन दिल्याचा दावा महंतांनी पत्रकारांशी बोलताना केला होता. 
शिंदे यांच्यासोबत असलेले अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, बच्च कडू आणि राजेश पाटील यड्रावकर यांनाही नव्या सरकारमध्ये मंत्रिपदे दिली जातील. एक किंवा दोघांना कॅबिनेट मंत्रिपदही दिले जाऊ शकते. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप-शिवसेना सरकारमध्ये शेवटी शिवसेनेचे पाच कॅबिनेट मंत्री आणि सात राज्यमंत्री असे एकूण बाराजण होते. यापेक्षा जास्त प्रतिनिधित्व शिंदे गटाला दिले जाईल. त्यांना 16 मंत्रिपदे दिली जाऊ शकतात. त्यामुळे सध्याच्या नऊ मंत्र्यांना पुन्हा मंत्री म्हणून सामावून घेताना शिंदे गटातील आणखी सात जणांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते. शिवसेनेला भाजपने गेल्यावेळी कमी मंत्रिपदे दिली अशी शिवसेनेची नाराजी होती. यावेळी बारापेक्षा अधिक पदे देऊन भाजपकडून हे सिद्ध केले जाईल की पूर्वीपेक्षा अधिक मंत्रिपदे शिंदे गटाला दिली जात आहेत. 
महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपदासह 14 मंत्रिपदे आहेत. त्याहीपेक्षा अधिक पदे देऊन हेही सिद्ध करण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारपेक्षाही जास्त वाटा शिवसेनेतून फुटून आलेल्या शिंदे गटाला देत सन्मानाची वागणूक देण्यात आली आहे. भाजप आणि शिंदे गटात मंत्रिमंडळ रचनेबाबत तीन फेऱ्यांची चर्चा आतापर्यंत झाली आहे. सरकार स्थापन करण्यातील सर्व कायदेशीर अडथळे दूर झाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा करून मंत्रिमंडळाचे अंतिम स्वरूप निश्चित केले जाऊ शकते. एकनाथ शिंदे यांच्या बाजूने बंडासाठी ज्या हालचाली गेले दोन-अडीच महिने सुरू होत्या, त्या हालचालींमध्ये शिवसेनेच्या ज्या दोन आमदारांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली त्या दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाची कमाल सदस्यसंख्या 42 इतकी असते. शिंदे गटाला 16 मंत्रिपदे दिली तर भाजपच्या वाट्याला 26 मंत्रिपदे येऊ शकतील. दोन्ही बाजूंचे काही समर्थक अपक्ष आमदार आहेत त्यांचे समाधान आपापल्या पातळीवर करावे, असा निर्णय होऊ शकतो.