If-eknath-Shinde-group-merges-with-raj-thackeray-MNS-understand-the-political-mathematics-of-profit-and-loss-202206.jpeg | शिंदे गट 'मनसे'त विलीन झाल्यास फायदा-तोट्याचं 'राज'कीय गणित समजून घ्या अन् तुम्हीच ठरवा...! | belgaum news | belgavkar बेळगावकर

शिंदे गट 'मनसे'त विलीन झाल्यास फायदा-तोट्याचं 'राज'कीय गणित समजून घ्या अन् तुम्हीच ठरवा...!

belgavkar.com | belgaum | belgavkar

महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती

महाराष्ट्र : राज्यात महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. एकनाथ शिंदेंच्या गटाकडून शिवसेनेला इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा धक्का देण्यात आला आहे. शिवसेनेचे अर्ध्याहून अधिक आमदार फुटलेत. अशावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून आता बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचं पाऊल उचललं गेलं आहे. एकनाथ शिंदे गटात जवळपास 42 आमदार आहेत. त्यामुळे शिवसेना अल्पमतात आहे. तरीही शिंदे गटाविरोधात अपात्रतेची कारवाईची मागणी केली जात असल्यानं शिंदे गटानं थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्याचवेळी शिंदे गटाकडून 'प्लान-बी'ची देखील आखणी सुरू असल्याचं बोललं जात आहे. शिंदे गटाचा 'प्लान-बी' खरंतर यशस्वी झाला तर एक घाव अन् दोन तुकडे असाच ठरेल. आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. तसंच आम्ही शिवसेना सोडलेली नाही यावरही ते ठाम आहेत. पण शिवसेनेनं राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेत शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हे नाव कुणालाही वापरता येणार नाही असा ठराव संमत करत शिंदे गटाला धक्का दिला आहे.
एकनाथ शिंदे म्हटलं की शिवसेना असं समीकरण ठाणे आणि परिसरात आजवर सर्वांनी पाहिलेलं आहे. शिवसेनेच्या जडणघडणीत शिंदे यांचं मोठं योगदान आहे. शिवसेना पक्षाची घटना पाहिली असता त्यात पक्षाच्या प्रमुखांना सर्वाधिकार आहेत. त्यामुळे शिंदेंना 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट' असा वेगळा गट स्थापन करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही अडचण एका फटक्यात दूर होऊ शकते ती म्हणजे शिंदे गट थेट मनसेत विलीन झाला तर अनेक उद्देश साध्य होऊ शकतात.
बाळासाहेब आणि हिंदुत्ववादी विचार
बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन जाण्यासाठीच आम्ही हे पाऊल उचललं आहे. त्यांच्या विचारांची प्रतारणा आम्ही होऊ देणार नाही, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यामुळे भाजपा किंवा इतर कोणत्याही पक्षात विलीन होण्यापेक्षा हिंदुत्ववादी विचारसरणीची कास धरलेल्या मनसेत विलीन होणं शिंदे गटासाठी फायदेशीर ठरेल. यातून 'ठाकरे' नावाशीही जवळीक ठेवता येईल आणि हिंदुत्ववादी विचारांसाठी राज ठाकरेंशी हातमिळवणी केल्याचा संदेश जनतेमध्ये देता येईल.
मनसे अन् भाजपाची जवळीक : मनसेनं हिंदुत्ववादी विचारसरणीला महत्व दिल्यामुळे आणि शिवसेना भाजपापासून दुरावली गेल्यानंतर भाजपा अन् मनसेच्या मनोमिलनाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून होत आली आहे. त्यामुळे मनसे देखील राज्यात भाजपासोबत सरकार स्थापन करण्यासाठी तयारी दाखवू शकते. त्यामुळे शिवसेना बाळासाहेब ठाकरे नावानं वेगळा गट स्थापन करण्यास शिंदेंना अपयश आल्यास मनसेत विलीन होण्याचा रामबाण उपाय त्यांच्यासोबत आहे. अर्थात राज ठाकरे याकडे कोणत्या दृष्टीनं पाहतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

मनसेचा फायदा काय? शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी पहिल्याच फटक्यात आपली ताकद दाखवत 13 आमदार निवडून आणले होते. पण पुढील निवडणूकांमध्ये मनसेला आपली आमदार टिकवता आले नाहीत. तसंच नाशिक महापालिकेतील सत्ता देखील गमवावी लागली. गेल्या काही वर्षांपासून मनसेची कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. यात नेहमी किंगमेकर म्हणून पाहिलं जात असलेल्या मनसेमध्ये एका फटक्यात 42 आमदार येतील. यामुळे पक्षाला राजकीय पटलावर एक ओळख प्राप्त होईल. सत्तेत आल्यामुळे मनसेला राज्यात पक्ष वाढीसाठी अनेक गोष्टी साध्य करुन घेता येतील. पुढील अडीच वर्षात मनसेला राज्यातील आपली पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी या आमदारांकरवी मोठं बळ निर्माण करता येईल. तसंच मुंबई महापालिका निवडणुकीवेळी शिवसेनेनं सात नगरसेवक एका रात्रीत फोडले होते. याची खल राज ठाकरेंना आहे. शिवसेनेनं केलेला प्रकार आपण कधीच विसरणार नाही असं राज ठाकरे म्हणाले होते. याचा वचपा काढण्यासाठी राज यांच्याकडे आजच्या परिस्थितीपेक्षा आणखी चांगली संधी असू शकणार नाही. ज्या दिलीप लांडेंना फोडून शिवसेनेनं मनसेला धक्का दिला होता. आज तेच दिलीप लांडे शिंदे गटात आहेत.
मनसेचा तोटा काय? एकनाथ शिंदे गटाला मनसेत विलीन केल्यास संबंधित आमदारांच्या मतदार संघांमध्ये गेल्या 13 वर्षांपासून मेहनत घेत असलेल्या मनसेच्या नेत्यांना मोठा फटका बसू शकतो. उदा. ठाण्यात एकनाथ शिंदे यांचं एकहाती वर्चस्व असलं तरी गेल्या काही वर्षांत मनसेसाठी अविनाश जाधव यांनी मोठा संषर्घ केला आहे. शिंदे मनसेत आल्यास अविनाश जाधव यांचं महत्व कमी होईल. अशाच पद्धतीनं विविध मतदार संघात मूळ मनसेच्या नेत्यांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते आणि राज ठाकरे असं होऊ देणार नाहीत.
फोडाफोडी अन् वाटाघाटींपासून राज नेहमी दूरच
फोडाफोडीच्या राजकारणावर आपण विश्वास ठेवत नाही अशी ठाम भूमिका राज ठाकरे घेत आलेले आहेत. तसे संस्कार आपल्यावर झालेलं नसल्याचंही राज ठाकरेंनी याआधी बोलून दाखवलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणाला एवढी मोठी कलाटणी मिळालेली नसताना त्यात आपण स्वारस्य दाखवून स्वत:च्याच भूमिकाला आणि प्रतिमेला राज ठाकरे तडा जाऊ देणार नाहीत. तसंच नागरिकांचाही रोष ओढावून घेण्यात राज ठाकरे स्वारस्य दाखवणार नाहीत.

स्वतंत्र पक्ष अन् वाटचाल : राज ठाकरेंच्या पक्षाची भूमिका नेहमीच इतर पक्षांपेक्षा स्वतंत्र राहिलेली आहे. युती-आघाड्यांपेक्षा आपली स्वतंत्र ओळख ठेवून पक्ष संघटनेला मजबूत करण्यावर राज ठाकरेंचा भर राहिलेला आहे. तो याही पुढे कायम राहू शकतो. गेल्या अडीच वर्षात राज्यात सुरू असलेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडींविरोधात नागरिकांमध्ये रोष आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मतदार या सर्व राजकीय कुरघोड्यांपासून दूर असलेला आणि आपलं स्वतंत्र अस्तित्व राखून असलेला पक्ष म्हणून मनसेकडे पाहात आहेत. हीच ओळख कायम ठेवण्याचा राज ठाकरेंना निवडणुकीत फायदा होऊ शकतो. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी जरी इच्छा व्यक्त केली तरी राज ठाकरेंकडून त्यास केराची टोपली दाखवली जाण्याचीच दाट शक्यता आहे.
शिंदे गटाचा फायदा मोठा : उद्धव ठाकरे गेले तरी राज ठाकरे सोबत राहतील. एक ठाकरे आपल्यासोबत आहेत, शिवाय हिंदुत्वही आहे. यासारखी चांगली परिस्थिती दुसरी असू शकणार नाही. आपण भाजपमध्ये प्रवेश करत नाही, मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंसोबत गेलो असे म्हणायला बंडखोरांचा गट मोकळा होईल. दोन तृतीयांश आमदारांनी एकत्र येऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तरच त्यांची आमदारकी कायम राहते. त्यामुळे आता बंडखोर आमदारांच्या गटाने मनसेमध्ये प्रवेश केला तर त्यांची आमदारकी कायम राखता येईल.