Belgaum_-Blame-for-uploading-offensive-text-on-royal_belgavkar-belgaum-202206.jpg | बेळगाव : 'royal_belgavkar' वर तेढ आक्षेपार्ह मजकूर अपलोड केल्याचा ठपका | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : 'royal_belgavkar' वर तेढ आक्षेपार्ह मजकूर अपलोड केल्याचा ठपका

belgavkar.com | belgaum | belgavkar

इंस्टाग्राम अकाउंटविरोधात गुन्हा दाखल

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सरकारी परिपत्रके मराठी भाषेतूनही दिली जावीत, या मागणीसाठी 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा करण्यात येणार आहे. यासाठी जनजागृती केली जात आहे. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. 'royal_belgavkar' या इंस्टाग्राम अकाउंटवर तेढ निर्माण करणारा आक्षेपार्ह मजकूर अपलोड केल्याचा ठपका ठेवत बुधवारी खडेबाजार पोलिसांनी इंस्टाग्राम अकाउंटविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे. त्यामुळे पोलिसांच्या या दडपशाहीविरोधात मराठी भाषेतून पुन्हा एकदा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी हवालदार बी. ए. नौकुडे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असल्याने पोलिसांनी 'रॉयल बेळगावकर' या इंस्टाग्राम अकाउंटविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बेळगावमध्ये बहुसंख्य मराठी भाषक असतानाही संबंधितांना मराठी भाषेतून सरकारी कार्यालयात परिपत्रके दिली जात नाहीत. केवळ कन्नड भाषेतून परिपत्रके उपलब्ध करून दिली जात असल्याने मराठी भाषिकांची गोची होत आहे. यापूर्वी अनेकवेळा जिल्हा प्रशासनाच्या विरोधात मराठी भाषिकांनी मोर्चे काढूनदेखील जिल्हा प्रशासन व कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे आता पुन्हा एकदा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जाणार आहे.
त्यासाठी समिती पदाधिकाऱ्यांनी गावोगावी बैठका घेऊन जनजागृती करण्यावर भर दिला आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जागृती केली जात आहे. 'रॉयल बेळगावकर' या इंस्टाग्राम अकाउंटवर मजकूर व्हायरल केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला आक्षेप घेतला आहे. इंस्टाग्राम पोस्टमुळे अकाउंटविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. एकंदरीत जाणीवपूर्वक कोणालाही अडकविण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.