Maharashtra-Politics-Putting-Uddhav-Thackeray-aside-BJP-will-form-a-government-with-the-rebels-mh-202206.jpeg | उद्धव ठाकरे यांना बाजूला ठेवत भाजप बंडखोरांसोबत सरकार बनवणार | belgaum news | belgavkar बेळगावकर

उद्धव ठाकरे यांना बाजूला ठेवत भाजप बंडखोरांसोबत सरकार बनवणार

belgavkar.com | belgaum | belgavkar

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्ता स्थापन करायची

उद्धव ठाकरे कशाच्या जोरावर एवढे निर्धास्त आहेत..?

महाराष्ट्र : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्ता स्थापन करायची. त्याचवेळी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात सरळ-सरळ भेद करत बाळासाहेबांना मानणारा वर्ग जवळ करण्याची रणनीती भाजपने आखली आहे. शिवाय सरकार बनवताना शिवसेनेला कसलीही सहानुभूती मिळणार नाही, याचीही भाजपकडून पुरेपूर काळजी घेतली जात आहे. मध्यंतरी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी केलेली विधाने भाजप अजूनही विसरलेली नाही. त्यामुळे आता सरकार बनवताना शिवसेना फोडूनच सरकार बनवायचे, मात्र उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे बाजूला ठेवायचे, असे नियोजन केले जात असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी केलेले भावनिक आवाहन शिवसैनिकांना अपील करणारे होते. पण, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊ केले तरी ती वेळ आता निघून गेली आहे. भाजप आणि बंडखोर शिवसैनिक आमदारांचा गट सरकार बनवण्याच्या प्रक्रियेत खूप पुढे गेल्याची माहिती एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे. एकनाथ शिंदे सातत्याने आम्ही बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे आहोत. आम्ही शिवसेना सोडणार नाही, असे सांगत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार पायउतार झाले तरी शिवसेनेचे काय होणार हा नवाच प्रश्न आता चर्चेत आला आहे.
बुधवारी काँग्रेसचे निरीक्षक कमलनाथ मुंबईत आले. त्यांनी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी फोन केला. मात्र आपण कोविड पॉझिटिव्ह आलो आहे, असे म्हणत ठाकरे यांनी त्यांच्याशी फोनवर बोलणे पसंत केले. परंतु ठाकरे यांनीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांची प्रत्यक्ष भेट घेतली. याचीही काँग्रेस वर्तुळात चर्चा सुरू झाली. पण, रात्री काँग्रेसचे नेतेही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी सरकारचे काय होणार या चिंतेत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्धास्त होते. सगळे काही व्यवस्थित पार पडेल, काळजी करू नका, असेही ते सांगत होते. सरकारला कसलाही धोका नाही. त्यामुळे तुम्ही घाईगडबडीत कोणत्याही फायली हातावेगळ्या करू नका, असा थेट सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे काही मंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या ठामपणाचीच चर्चा आज दोन्ही काँग्रेसमध्ये सुरू होती. काँग्रेसचे काही नेते पक्षाचे निरीक्षक कमलनाथ आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना भेटायला आले त्यावेळी, ‘’मुख्यमंत्रीच एवढे निर्धास्त आहेत, तुम्ही कशाला काळजी करता...’’ असे सांगून त्यांना रवाना केले गेले. शिवसेनेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले असतानाही उद्धव ठाकरे कशाच्या जोरावर एवढे निर्धास्त आहेत..? आणि सरकारला काही होणार नाही याची खात्री देत आहेत, असा प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांना पडला आहे. नेमके काय होत आहे याचा सुगावा या नेत्यांना लागत नाही. 
एकनाथ शिंदे महाराष्ट्रात चंद्राबाबू नायडू होतील का, असा एक नवा प्रश्न काही नेत्यांना पडला आहे. ज्या पद्धतीने चंद्राबाबू यांनी मुसंडी मारली होती, तेवढी क्षमता आणि ताकद एकनाथ शिंदे उभी करू शकतील का? भाजप त्यांना तेवढी ताकद मिळू देईल का, असे प्रश्नही बुधवारी चर्चेत होते. एकनाथ शिंदे यांची क्षमता 12 ते 13 आमदार गोळा करण्याची असताना, एवढे आमदार आणि खासदार त्यांच्यासोबत जातात कसे? याचीही दोन्ही काँग्रेसमध्ये चर्चा आहे. महाराष्ट्रात भाजपला स्वबळाची सत्ता हवी आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांना शिवसेना सोबत नको आहे. मात्र शिवसेना फोडून त्यांच्यातला एक गट सोबत घ्यायचा आणि शिवसेनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करायचे. म्हणजे शिवसेनेला सहानुभूती मिळणार नाही, असाही एक डाव यामागे असल्याचे सांगण्यात येते. 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील नाराजी हेदेखील एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचा मोठा गट शिवसेनेतून बाहेर जाण्याचे एक कारण असताना अजित पवार यांच्याविषयी ठाकरे काहीच बोलत का नाहीत, असे सांगून शिवसेनेचा एक नेता म्हणाला, आमचा राग उद्धव ठाकरे यांच्यावर नाहीच. ते ज्या पद्धतीने अजित पवार यांची पाठराखण करत आहेत, त्याबद्दल आमची टोकाची नाराजी आहे. वारंवार सांगूनही ते जर आमच्या सूचना ऐकतच नसतील, तर आम्हाला दुसरा पर्याय तरी काय उरतो, असेही या नेत्यांनी नेत्याने स्पष्ट केले.