बेळगाव : मराठी कागदपत्रांसाठी मोर्चा काढण्याआधी महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी पुन्हा एकदा चर्चा केली. मराठीतून परिपत्रके तसेच शहरातील फलक मराठीत लावण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीच्या वतीने 27 जून रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. घटनात्मक अधिकारानुसार मराठी कागदपत्रांसाठी 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मध्यवर्ती समिती विराट मोर्चा काढणार आहे. त्याबाबत गावागावांत जनजागृती सुरू आहे. या मोर्चाबाबत माहिती देण्यासाठी मध्यवर्ती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याशी चर्चा केली आहे.
27 जून रोजीच्या मोर्चाची माहिती देण्यासाठी मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखाली समिती शिष्टमंडळाने भेट घेतली. मराठी कागदपत्रांसाठी 27 जून रोजी मराठी भाषिक हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून, भव्य मोर्चासाठी बेळगाव, खानापूर व निपाणी भागातील गावागावांत जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी दिली आहे.