कर्नाटक : आणखी 5 कोरोना पॉझिटिव्ह; ओमीक्रॉन पसरू लागला?

belgavkar.com | belgaum | belgavkar

एका रुग्णाच्या संपर्कात आलेले 5 जण पॉझिटिव्ह

कर्नाटक : देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने प्रवेश केला आहे. जेव्हा साऊथ आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमीक्रॉन सापडला त्याच्या आधीच या व्हेरिअंटने भारतात प्रवेश केला होता. आफ्रिकेतून दोघे बाधित कर्नाटकातील बंगळुरूमध्ये आले होते. आता त्यांच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी 22 आणि 25 नोव्हेंबरला घेण्यात आली होती. त्यांचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले होते.  बंगळुरु महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकात आलेल्या दोन व्यक्तींना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. यापैकी 46 वर्षीय व्यक्तीच्या थेट संपर्कात तिघे जण आले होते. तर या तिघांच्या संपर्कात आणखी दोघे जण आले होते.
या पाचही जणांची 22 आणि 25 नोव्हेंबरला कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये पाचही जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, 46 वर्षीय व्यक्तीला ओमीक्रॉनची बाधा झालेली असल्याचे आज समजले आहे. यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या पाचही जणांची पुन्हा चाचणी करण्यात आली आहे. बंगळुरु पालिकेने ते कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांना आयसोलेट केल्याचे म्हटले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या पाचही जणांच्या स्वॅबचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. याचा अहवालाची वाट पाहत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेहून आलेले दोन्ही रुग्ण हे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले म्हणजेच पूर्ण व्हॅक्सिनेटेड होते. तसेच ते आफ्रिकेतून दुबईमार्गे भारतात आले होते. 
दुसरा रुग्ण भारत सोडून गेला... ओमीक्रॉनने संक्रमित 66 वर्षीय रुग्ण हा भारतात सापडलेला पहिला रुग्ण आहे. तो पहिल्यांदा भारतात आला होता. कोरोना चाचणीत तो पॉझिटिव्ह सापडला होता. यामुळे त्याच्यावर बंगळुरुमध्येच उपचार करण्यात आले होते. उपचारानंतर तो पुन्हा मायदेशी परतला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. परंतू दुसऱ्या रुग्णाने टेन्शन वाढविले आहे. त्याच्या संपर्कात आलेले पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत. 

दक्षिण आफ्रिकेने जगाला सावध केलेले : कोरोनाचा नवा व्हेरिअंट सापडल्याने दक्षिण आफ्रिकेने 26 नोव्हेंबरला जगाला सावध केलेले. मात्र, त्या आधीच हा व्हेरिअंट अस्तित्वात असल्याने तो जगभरात पसरू लागला होता. भारतात या व्हेरिअंटचे रुग्ण आधीच दाखल झाले होते. परंतू तेव्हा हा व्हेरिअंट सुप्तावस्थेत होता. जगभरात खळबळ उडाल्यानंतर या व्हेरिअंटची लागण झालीय का याची जिनोम सिक्वेंसिंगद्वारे तपासणी करण्यात आली तेव्हा या दोघांना ओमीक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले.