महाराष्ट्राच्या वेशीवर ओमीक्रॉन, 'त्या' 6 रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा

belgavkar.com | belgaum | belgavkar

Omicron ची भारतात एन्ट्री : कर्नाटकात आढळले ओमीक्रॉनचे 2 रुग्ण

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ओमीक्रॉन या कोरोनाच्या घातक व्हेरियंटचा भारताती शिरकाव झाला आहे. कर्नाटकमध्ये ओमीक्रॉनचे 2 रुग्ण सापडले आहेत. त्या दोघांना बंगळुरू विमानतळावरून थेट पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवण्यात आलं. तिथंच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ओमीक्रॉन महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन ठेपल्यानं महाराष्ट्राचीही चिंता वाढली आहे. कर्नाटकात आलेल्या या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण 11 तारखेला तर दुसरा रुग्ण 20 नोव्हेंबरला भारतात आले होते. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता Omicron ची लागण झाल्याचंही समोर आलं आहे. बुधवारी रात्री दोघांचे अहवाल आले, दोघांवर उपचार सुरू असून त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. या दोन्ही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आढळून आली होती. सध्या घाबरण्याची गरज नसली तर खबरदारी घेणं महत्त्वाचं असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
6 प्रवाशांच्या अहवालाची प्रतीक्षा
दक्षिण आफ्रिकेसह इतर आफ्रिकन देशातून महाराष्ट्रात आलेले 6 प्रवासी कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आलेत. त्या नमुन्यांमध्ये काय आढळतं, याकडं अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या 6 प्रवाशांमुळं अख्खा महाराष्ट्र गॅसवर आहे. कल्याण डोंबिवली, मुंबई, मीरा भाईंदर, पुणे या भागात अफ्रिका खंडातून आलेले प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये नायजेरियातून आलेले दोघे पॉझिटिव्ह आढळले आहेत.
आणखी 4 जण कोरोना पॉझिटिव्ह
दरम्यान, दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज आणखी 4 जण कोरोना पॉझिटिव्ह (omicron) आढळून आले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत असलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे.  भारताने ओमीक्रॉन चा संसर्ग असलेल्या धोकादायक देशांची यादी जारी केली. यात दक्षिण आफ्रिकेसह यूरोपातील देशांचा समावेश आहे. आता ओमीक्रॉनचा संसर्ग असलेल्या धोकादायक देशांमधून आलेले चार प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. ICMR डीजी बलराम भार्गव म्हणाले की, जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे कर्नाटकमध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनची दोन प्रकरणे आढळून आली आहेत. यासोबतच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं की, आतापर्यंत सुमारे 29 देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटची 373 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.