1901 नंतर पहिल्यांदाच नोंव्हेबरमध्ये विक्रमी पाऊस; हवामान विभाग

belgavkar.com | belgaum | belgavkar

गेल्या काही आठवड्यांपासून पावसाचे गणित बिघडून गेल्यासारखी परिस्थिती आहे. अनेक राज्यांमध्ये पूर परिस्थिती आहे. हिवाळ्याचे महिने सुरु झाले तरीही पावसाळा काही आपली पाठ सोडायला तयार नाहीये. मागील 24 तासापासून पावसाची संततधार सुरु आहे. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह काही प्रदेशात पाऊस सुरु आहे. दरम्यान अरबी समुद्रावरून येणाऱ्या ढगांमुळे पुन्हा एकदा राज्यातील काही प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवली आहे. दुसरीकडे भारतीय उपखंडामध्ये (Peninsular India) या नोव्हेंबर महिन्यात पडलेला पाऊस हा गेल्या शंभर वर्षातला विक्रमी पाऊस असल्याची नोंद करण्यात आली आहे.
1901 नंतर पहिल्यांदाच आंध्र प्रदेश, तमिळ नाडू, पुदुच्चेरी, केरळा आणि दक्षिण कर्नाटकामध्ये गेल्या नोव्हेंबर महिन्यात तब्बल 169 टक्के जास्त पाऊस पडला आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ने दिली आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे गेले काही दिवस दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी राज्यातील काही भागात पावसाची रिमझिम सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी काही प्रदेशात येलो आणि काही भागात ओरेंज अर्लटचा हवामान खात्याने इशारा दिला होता.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात नोव्हेंबरमध्ये 645 वेळा मुसळधार तर 169 वेळा अतिमुसळधार पाऊस पडला आहे. त्याचप्रमाणे, या महिन्यात 11 वेळा अतिवृष्टीची नोंद झाली. गेल्या वर्षीही नोव्हेंबरमध्ये 11 वेळा अतिवृष्टी झाली होती. यातील बहुतेक अतिवृष्टी दक्षिण भारतात झाली. अतिवृष्टीमुळे आंध्र प्रदेशात 44 , तमिळनाडूत 16, कर्नाटकात 15 आणि केरळमध्ये तिघांचा मृत्यू झाला. देशात नोव्हेंबरमध्ये सरासरी 30.5 मिलिमीटरर पाऊस पडतो. मात्र, या वर्षी 56.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस सरासरीपेक्षा 85 टक्क्यांनी अधिक आहे. विशेषत: दक्षिण भारतात नोव्हेंबरमध्ये सरासरी 89.5 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा सुमारे 232 मिलिमीटर पाऊस पडला. तो 160 टक्के अधिक आहे. या अतिवृष्टीमुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांत अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली.