बेळगावात जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा; 2 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : ओमिक्रॉनच्या धास्तीने हैराण झालेल्या बेळगावकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. येत्या आठवडाभरात बेळगावात जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा उभारली जाणार आहे. या प्रयोगशाळेमुळे कोरोना चाचण्यांची क्षमता तर वाढणार आहेच, शिवाय ओमिक्रॉनसह अन्य विषाणूंची चाचणीही या प्रयोगशाळेत करता येणार आहे. बेळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात म्हणजे बिम्समध्ये ही प्रयोगशाळा सुरू होणार आहे. राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे मुख्य सचिव टी. के. अनिलकुमार यांनी ही माहिती दिली आहे.
'त्या' दोघा विद्यार्थ्यांची जिनोम चाचणी
बेळगावात खाजगी डेंटल कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा (मूळचे बिहार) कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे का, याची पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी नमुने जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळेत पाठविले आहेत. बेळगावात प्रयोगशाळा झाल्यास बाहेर नमुने पाठविण्याची गरज भासणार नाही.

बेळगावसह गुलबर्गा व म्हैसूर येथेही ही प्रयोगशाळा सुरू केली जाणार आहे. कोरोनोच्या दुसऱ्या लाटेत राज्यात सहा ठिकाणी जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते. दुसरी लाट जुलै महिन्यात ओसरली; पण प्रयोगशाळा मात्र सुरू झाली नाही.
आता तिसऱ्या लाटेची शक्यता व ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर 6 ठिकाणी प्रयोगशाळा सुरू केल्या जात आहेत. बेळगावात सध्या कोरोना चाचणी आयसीएमआर तसेच बिम्स येथील प्रयोगशाळेत केली जात आहे. बेळगावात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. त्यावेळी चाचणीसाठी प्रयोगशाळा नव्हती. स्वॅब पुणे, बंगळूर किंवा शिमोगा येथे पाठविले जात होते. केंद्र शासनाच्या आयसीएमआर येथे आधी कोरोना चाचणी सुरू झाली. त्यानंतर बिम्स व काही खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळा सुरू झाली. कोरोना व्यतिरिक्त अन्य विषाणूंच्या चाचणीची सुविधा बेळगावात नाही. त्यामुळे ओमिक्रॉन चाचणीसाठी नमुने बंगळूर किंवा पुणे येथे पाठवावे लागत आहेत. देशात अद्याप ओमिक्रॉनचा एकही बाधित नसल्याचा निर्वाळा केंद्रीय आरोग्य विभागाने दिला असला तरी ओमिक्रॉन व संबंधित अन्य विषाणूंचा शोध घेण्यासाठी प्रयोगशाळा सुरू केल्या जाणार आहेत. बेळगावात ही प्रयोगशाळा सुरू होणार आहे. येथे प्रयोगशाळा सुरू होताच लगेचच चाचण्याही सुरू होणार आहेत.