बेळगावसह राज्यातील अनेक भागात 3 दिवस पावसाचा इशारा

belgavkar.com | belgaum | belgavkar

गेल्या तीन दिवसांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात पाऊस सुरू आहे. कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्यास बुधवारी सुरुवात झाली आहे. गुरुवारी हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. शनिवारी हे वादळ आंध्र प्रदेश किनारपट्टीवर धडकणार आहे. दरम्यान, बेळगावसह कर्नाटकात व कोकण, कोल्हापूरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणखी 3 दिवस राहणार आहे. 1 डिसेंबर रोजी दुपारी हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण थायलंड ते अंदमानच्या समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले आहे.
बेळगाव, कोल्हापूर, पुणे, मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवार-बुधवारी मध्यरात्रीपासून या अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. रात्री पाऊस पडल्यानंतर मध्येच थांबला होता. मात्र बुधवारी सकाळपासून पुन्हा पावसाने जोर धरला. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, मराठवाडा आणि कोकण भागासह अनेक ठिकाणी 3 डिसेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
दरम्यान, डिसेंबर महिन्यात हा अचानक पाऊस येण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे अग्नेय अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. हे पूर्व-मध्य अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे होत आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अनेक राज्यांमध्ये 'Jawad' चक्रीवादळाचे सावट!
हवामानातील या अचानक बदलामुळे केवळ महाराष्ट्रच नाही तर अनेक राज्यांत पाऊस पडत आहे.

आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे या वादळी चक्रीवादळाची स्थिती तयार झाली आहे. अशा परिस्थितीत आता हवामान खात्याने चक्रीवादळाबाबत अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर पश्चिम आणि मध्य भारताच्या लगतच्या भागात वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार करण्यात आला आहे. यामुळे हवामानात बदल झाला आहे. हवामानातील बदलामुळे 3 डिसेंबरपर्यंत देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल. 3 डिसेंबर रोजी पावसाचा जोर आणखी वाढेल आणि त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल.

अंदमान समुद्राच्या मध्यभागी असलेले कमी दाबाचे क्षेत्र बुधवारपर्यंत पश्चिम-उत्तर आणि पश्चिमेकडे सरकेल, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला होता. याच कारणास्तव बुधवारी महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यानंतर बंगालच्या उपसागरात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल. आतापर्यंत हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणेच घडले आहे. आता हे वादळ 4 डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारी भागात धडकणार आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल. अरबी समुद्रातील या चक्रीवादळामुळे आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे गुजरातमध्येही येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांना त्यांची कापणी केलेली पिके सुरक्षित स्थळी नेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.