सीमाप्रश्नी दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा - शरद पवारांचे आश्वासन

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दिवाळी नंतर चर्चा करून पुढील रणनीती बाबत पाठपुरावा करू असे आश्वासन माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी दिले. बुधवारी सकाळी बारामती मुक्कामी बेळगावातील पत्रकार आणि माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी भेट घेतली, त्यावेळी पवार यांनी आश्वासन दिले. सध्या केंद्रातील भाजप सरकारची बेळगाव प्रश्नी भूमिका उदासीन आहे, त्यामुळे या लढ्याला गतिशील करण्यासाठी प्रयत्नशील राहू.

1993 मध्ये आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सीमाप्रश्नी जो तोडगा मांडला होता त्यात बेळगावच्याचं लोकांनी खो घातला होता. आता तो तोडगा पुन्हा मंजूर करून घेण्यासारखी परिस्थिती नाही. कारण महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादीचे सरकार असले तरी कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे केंद्राचा कर्नाटकाला पाठिंबा असून सीमाप्रश्नी केंद्राची भूमिका समाधानकारक नाही तरीही आपण लवकरात लवकर दिवाळीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सीमाप्रश्नी गांभीर्याने चर्चा करून पुढे काय करता येईल याची साधक-बाधक चर्चा करणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि सीमावासीयांचे खंबीर नेते शरदरावजी पवार यांनी दिली.
सध्या खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष आणि माजी आमदार दिगंबर पाटील यांनी 1993 च्या तोडग्याचा उल्लेख करून सीमाभागात एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. त्या संदर्भातच कोल्हापूर येथे मोठे आंदोलन घेण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनी मांडलेला तोडगा काय होता आणि त्या तोडग्या संदर्भात आता काय करता येईल? का याचा आढावा घेण्यासाठी बेळगाव येथील पत्रकार आणि काही नेते मंडळी बारामती येथे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेली होती. त्यावेळी तोडगा अस्तित्वात आणण्यासारखी परिस्थिती तेव्हा होती. त्यावेळेला मी सत्तेत मजबूत होतो आणि कर्नाटकातील वातावरणही त्या दृष्टीने पोषक होते. आता मात्र कर्नाटकात आणि केंद्रात असलेल्या भाजप सरकारला या प्रकरणी कोणती सहानभूती असेल असे वाटत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतले जातील असे त्यांनी सांगितले.
बेळगावचा सीमाप्रश्न हा बेळगाव शहरातील लोकांपेक्षा आसपासच्या गावांमुळे आजही टिकून आहे. सीमाप्रश्नी आजूबाजूच्या गावांचे, बेळगाव आणि खानापूर तालुक्याचे मोठे योगदान आहे. असेही शरद पवार यावेळी म्हणाले. यावेळी बेळगावात सध्या स्थितीत चालू असलेल्या घडामोडींची माहिती पवार यांना शिष्टमंडळाने दिली. अमित देसाई यांनी आनंद मेणसे लिखित सीमाप्रश्नाबद्दल चे पुस्तक शरद पवार यांना दिले. सीमाभागात होत असलेल्या अन्याय अत्याचार आणि सध्याची परिस्थिती या संदर्भात सरस्वती पाटील यांनी माहिती दिली. यावेळी प्रकाश बेळगोजी, जितेंद्र शिंदे, मिलिंद देसाई यांच्यासह इतर पत्रकार, समिती नेते, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

सीमाप्रश्नी दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा - शरद पवारांचे आश्वासन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm