देशाची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल पण...; सणसमारंभाच्या काळात तज्ज्ञांनी केलं सावध

belgavkar.com | belgaum | belgavkar

कोरोनाच्या संकटात सणसमारंभामध्ये निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. येत्या 3 महिन्यांत डेल्टा व्हेरिएंटचा धोका असल्याची माहिती आता समोर येत आहे. तज्ज्ञांनी याबाबत लोकांना सतर्क केलं असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. येत्या तीन महिन्यांत अनेक सण येणार आहेत. याच दरम्यान काही समारंभाचं देखील आयोजन करण्यात येईल. मात्र यामुळेच लोकांची मोठ्या संख्येने गर्दी होईल आणि हेच कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यामागचं कारण ठरू शकतं.
सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे. लोकांनी अत्यंत सतर्क राहणं गरजेचं आहे. घरच्या घरीच सण साजरे करा. सणांच्या काळात लोकांचा हलगर्जीपणा चिंता वाढवू शकतो. त्यामुळचे कोरोना नियमांचं पालन करा असं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. देशाला कदाचित दुसऱ्या कोरोना लाटेसारखा फटका बसणार नाही असं आता तज्ज्ञांनी म्हटलं आहे. सध्या भारतात जरी कोरोना संसर्गाची प्रकरणे कमी होत असली तरी कोरोना पूर्ण कमी होईल, असे म्हटले जाऊ शकत नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
देशात दिवाळी यांसारखे अनेक सण पाहता तज्ञांनी इशारा दिला आहे. सध्याच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये घट होणे हे कोरोना संपत असल्याचे लक्षण नाही. अनेक ठिकाणी आजही मृत्युदर जास्त असल्याने काळजी घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. देशात वेगाने लसीकरण मोहीम हाती घेतली असून त्याचा फायदा होत आहे. आरोग्य तज्ज्ञांनी यूकेसारख्या देशांचा उल्लेख केला, जिथे कोविड-19 ची प्रकरणे पुन्हा वाढत आहेत. नवे नवे व्हेरिएंट आढळून आल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. भारतात कोरोना लसीच्या 100 कोटी डोसचा टप्पा गाठण्यात आला आहे. याच दरम्यान तज्ज्ञ शाहीद जमील यांनी कोरोना लसीकरणाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे, परंतु ते आणखी वाढवण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. भारतातील आघाडीच्या विषाणूशास्त्रज्ञांपैकी एक असलेल्या शाहीद जमील यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, मला अजूनही खात्री नाही की, आपल्याकडील कोरोना परिस्थितीमध्ये सुधारणा होत आहे. अजून काही कामे बाकी आहेत. कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल करत आहोत, पण अजून तिथे पोहोचलो नाही. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. याआधी दिवसाला दररोज 40 हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. पण आता 15 हजारांच्या आसपास आढळत आहेत. पण तरी देखील सतर्क राहणं गरजेचं आहे.