बेळगाव : मिरवणुकीचा अट्टहास आणि दबाव

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : देशातील जनता आता कोठे कोरोनाच्या महाभयंकर संकटातून बाहेर पडत आहे. यादरम्यान राज्योत्सवानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यासाठी परवानगी द्यावी, अशी अजब मागणी करून प्रशासकीय यंत्रणेवर दबाव आणण्याचा केविलवाला प्रयत्न कन्नड संघटनांतर्फे सुरू आहे. बेळगाव जनतेचा कमी व अन्य भागांतील नागरिकांची भरणा राहणाऱ्या मिरवणुकीमुळे जनतेला वेठीस धरले जाते. वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. यामुळे मिरवणुकीला परवानगी नको, असा सूर आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप पूर्ण कमी झालेला नाही. पण, कन्नड संघटनांचे कार्यकर्ते सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये जमले व जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन मिरवणुकीसाठी आग्रह धरला. धरणे आंदोलनाचा इशारा दिला. एकीकडे कोरोनाच्या संसर्गातून जनता बाहेर पडत आहेत. यादरम्यान मिरवणुकीचा अट्टहास जनतेच्या जिवाशी बेतणारा आहे. यामुळे मिरवणुकीला परवानगी देऊ नये, अशी मागणी आहे. यादिवशी दिवसभर वाहतूक कोंडी होते. यामुळे वाहतुकीचा मार्ग बदलण्यात येतो. या शिवाय पर्यायीमार्गावरून वाहतूक सुरु ठेवली जाते. पण, एकेरी वाहतूक असल्यामुळे वाहतुकीची कोंडी घडते.
कोरोनाच्या सावटात कन्नड संघटनेच्या हट्टापायी 1 नोव्हेंबर रोजी होणार्‍या या राज्योत्सवासाठी पैशांची उधळपट्टी सुरु झाली असून राज्योत्सवाला हाताच्या बोटाएवढे मोजता येणारे दिवस बाकी असताना बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कमान उभारणीचे काम सुरू आहे. सीमाभागामध्ये मराठी भाषिक मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासाठी सरकारी राज्योत्सव दिन साजरा केला जातो. राज्योत्सव साजरा करण्यासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून लोकांना बोलविले जाते. विविध ठिकाणी कमानी उभारण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. कोरोनामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. व्यवसाय नाही, नोकर्‍या नाहीत. मात्र सरकार राज्योत्सवाच्या नावाखाली पैशाचा चुराडा करत आहे.